राज्यात चाललंय काय? कराडच्या आश्रमात देहविक्री? गतीमंद मुलींकडून मालिश आणि...
Satara : बदलापूरच्या घटनेनंतर महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनेतही गेल्या काही दिवसात वाढ झालीय. त्यातच आता साताराच्या निराधार आश्रमात देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तुषार तपासे, झी मीडिया,सातारा : राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. चिमुकल्या मुलीही नराधमांच्या वासनेचा शिकार होताहेत.. बदलापूरच्या घटनेनंतर (Badlapur Case) तर शाळेतील मुलीही सुरक्षित नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. आता अशीच एक धक्कादायक साताऱ्यातील कराडमधून (Karad) समोर आली आहे. कराडच्या टेंभू इथल्या निराधार आश्रमात अनाथ मुली आणि महिलांना मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय. या आश्रम शाळेच्या संचालिका गतीमंद मुलांकडून मालिश करुन घेत असल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी पोलिसांनी आश्रमशाळेच्या संचालिका आणि तीच्या साथिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आश्रमात देहविक्रीचा व्यवसाय
कराडच्या निराधार आश्रमात जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा आरोपही तक्रारदार महिलेने केला आहे. गतीमंद मुलींचे देखील हाल सुरु असल्याचं समोर आलं आहे. सातारा - सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली कराड टेंभू इथल्या आश्रमामध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. अनाथ मुली आणि महिलांना या आश्रमात आश्रय दिला जातो आणि त्यानंतर त्यांना मानसिक त्रास आणि अश्लील वर्तणूक करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप एका महिलेने केलेला आहे
गतीमंद मुलींकडून मालिश
या आश्रमामध्ये गतीमंद मुलीकडून आश्रम चालक महिला पायाला मॉलिश करून घेतानाचा आणि मारहाण करतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. एवढेच नव्हे तर आश्रम चालक महिलेच्या स्वयंपाक घरामध्ये चक्क दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलंय. यात एक मुलगी पाण्याच्या हंड्यातून दारूच्या बॉटल घेऊन त्या बरणीमध्ये ठेवत असल्याचं दिसत आहे. या प्रकरणी कराड पोलिसांनी 'आई चॅरिटेबल ट्रस्ट निराधार आश्रमा'च्या संचालिका आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे
राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ
अकोला जिल्ह्यातही शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडलीय. जिल्हातील काझीखेडा जिल्हा परिषदेच्या शाळेतील 6 विद्यार्थिनींवर शिक्षकानंच लैंगिक अत्याचार केला. विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून हा शिक्षक मुलींवर अत्याचार करायचा. या नराधम शिक्षकाला अटक कऱण्यात आलीय.. त्याशिवाय केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकाचं निलंबन करण्यात आलं. तर पुण्यात मुलींवरील अत्याचाराच्या दोन घटना समोर आल्यात.. 15 ऑगस्टला भवानी पेठ परिसरातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचं समोर आलंय.. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून एका 19 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली..तर दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर चौघा नराधमांनी अत्याचार केला.. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्यात तर दोघांचा शोध सुरू आहे.