परिवहन मंत्री अनिल परब अडचणीत, मुंबईनंतर पुण्यात EDचे मालमत्तांवर छापे
Anil Parab Money laundering case, ED Raid : महाविकास आघडी सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे.
मुंबई : Anil Parab Money laundering case, ED Raid : महाविकास आघडी सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. मुंबईतील बांद्रा येथील घरासह मरिन ड्राईव्ह येथील शासकीय निवासस्थानी ईडीने छापेमारी केली आहे. तसेच पुणे आणि रत्नागिरीतील मालमत्तांवर छापे टाकले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी परबांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याने परबांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
ईडीच्या छाप्यांमागे सचिन वाझे कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. पोलीस बदल्यांप्रकरणी आरोपी वाझे यांच्या जबाबामध्ये अनिल परब यांचे नाव समोर आलं होते. वाझेच्या जबाबानंतर ईडीकडून तपास सुरु झाला आहे. त्याच अनुषंगाने ईडीने छापेमारी सुरू केली आहे.
पुण्यात ईडीची कारवाई
मुंबईपाठोपाठ पुण्यात देखील अनिल परब यांच्या संबंधित व्यक्तींवर छापेमारी सुरु आहे. विभास साठे यांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकलेत. पुण्याच्या कोथरूड भागात द पॅलाडियम आणि इंद्रधनू या इमारतीमध्ये छापेमारी सुरु आहे. या व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. पुण्यातील याच निवासस्थानी पहाटेच ईडीचं पथक दाखल झाले आहे. विभास साठे यांचा इंद्रधनू अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये भाडेकरू राहतात. त्याठिकाणी भाडेकरुंकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे.
अनिल परब यांच्या मुंबईतील निवासस्थानासह पुणे मुंबई आणि रत्नागिरी येथील सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून ईडीनेही कारवाई सुरु केली आहे. या पथकात जवळपास चार अधिकारी आहेत. अनिल परब यांच्याशी संबधीत चौकशी करण्यासाठी ईडीचं पथक पुण्यातही पोहोचलं आहे. पुण्यातील कोथरुड परिसरातील दी पॅलेडियम या ठिकाणी 20 व्या मजल्यावर राहणारे विभास साठे यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे.
यात 1 कोटी 10 लाखांचा व्यवहार झाला होता, असे समजते. एका व्यवहारात साठे यांना ब्लॅकमनी दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. विभास साठे हे एक उद्योजक आहे. झालेल्या व्यवहारातील कागदपत्रांवर विभास साठे नावाने बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत आणि त्यासाठी पालकमंत्री अनिल परब यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा उपयोग केला आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता.