`पवारांना रोखायचं, ठाकरेंनी गद्दारी केली त्यांना...`, शाहांचं आवाहन; विदर्भातील जागांचं टार्गेटही ठरलं
Amit Shah Speech In Nagpur: `आपल्यातले सर्व मतभेद दूर करा. भाजपचा चांगला कार्यकर्ता तोच ज्याला समजूत घालण्याची गरज पडत नाही,` असं अमित शाहांनी आपल्या भाषणात म्हटलं.
Amit Shah Speech In Nagpur: भाजपमध्ये निवडणूक जिंकण्याचा पाया ऊर्जावान बूथ कार्यकर्ते आणि संघटना आहे, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नागपूरमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले. "निवडणुका जवळ आल्या की इतर राजकीय पक्ष सभा आणि रोड-शो करण्यास सुरुवात करतात, पण भाजप आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित करते. विदर्भात भाजपची मजबूत स्थिती आहे, महाराष्ट्रात भाजप सरकार स्थापन करेल," असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला. विदर्भ भाजपचा गड राहिला आहे. विदर्भात भाजप मजबूत राहिली तर महाराष्ट्रात भाजपा जिंकते, असंही अमित शाह म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "भाजपचे कार्यकर्ते वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर सांस्कृतिक राष्ट्रवाद प्रस्थापित व्हावा, याशिवाय भारताला सामर्थ्यवान, सुरक्षित आणि समृद्ध बनवण्यासाठी काम करतात," असंही अमित शाह म्हणाले. अमित शाह यांनी आपल्या भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.
वक्फचा कायदा पुढील अधिवेशनात
"लोकसभा निवडणुकीनंतर काही कार्यकर्तेंत नैराश्यात आहेत. मात्र, निराश होण्याच कारण नाही. 2024 मध्ये आपलं सरकार पुन्हा आलं आहे. भाजप जिंकली आहे. विरोधकाना त्यांच्या स्वप्नात राहू द्या," असा टोला शाह यांनी विरोधकांना लगावला आहे. "गेल्या दहा वर्षातील आमच काम आठवा. कोणी विचार केला होता का, राम मंदिर उभं राहील, उभं राहिलं की नाही? कोणी विचार केला होता का, कलम 370 काश्मीरमधून हटवलं जाईल. हटवलं की नाही? कोणी तिहेरी तलाक संपुष्टात येईल असा विचार केला होता का? आम्ही सीएए आणलं, आम्ही यूसीसी आणलं. वक्फचा कायदा ही पुढील अधिवेशनात पारित करु," असं अमित शाह कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.
विदर्भात टार्गेट किती जागांचं?
"आमचं सरकार आल्यानंतर सीमेवर असा सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राईक केला की पाकिस्तानच्या सीमेवर आज गोळी चालत नाही. ते गोळीबार विसरले आहेत. नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर आहे," असं अमित शाह भाषणात म्हणाले. "निराश होण्याचे कारण नाही. आपण दोन जागांवर होतो तिथून 2014 मध्ये आपण पूर्ण बहुमत मिळवले. विदर्भात 45 चे लक्ष्य ठेवा. महाराष्ट्रात सत्ता मिळवायचे असेल तर विदर्भात सरशी साधावी लागेल. 45 जागा महायुतीला जिंकायच्या आहेत," असं अमित शाहांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. "आपल्या दोन्ही सहकाऱ्यांसोबत भाजप कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे, असंही अमित शाहांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. "आपल्या विभागातील सर्व सहकारी संस्थांना भेट द्या आणि शेतकऱ्यांना मोदी सरकारच्या शेतकरी हिता संबंधित सर्व योजनांची माहिती द्या," असं आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलं आहे.
नक्की वाचा >> 'मुख्य आरोपी एकनाथ शिंदे व अजित पवारांबरोबर हास्यविनोद करताना सरन्यायाधीश दिसतात तेव्हा..'; ठाकरेंच्या सेनेची टीका
ठाकरे, पवारांवर साधला निशाणा
"आपले लक्ष्य शरद पवारांना रोखायचे आहे. उद्धवजींनी आपल्यासोबत गद्दारी केली त्यांना रोखायचे आपले लक्ष्य आहे. काँग्रेस पक्षाला रोखून खाली ओढायचे आहे," असं अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले. यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केल्यानंतर, "मोठ्या आवाजात घोषणा करा. इथून शरदरावांपर्यंत आवाज गेला पाहिजे," असं अमित शाह म्हणाले. "राहुल गांधी अमेरिकेत बोलून आले की विकास झाल्यावर आरक्षण संपवलं जाईल. पण भाजप असं होऊ देणार नाही," असंही अमित शाह म्हणाले.
बूथ कार्यकर्ता भाजपाचा प्राण तर इतर पक्षांसाठी मजूर
"बूथवर 10 टक्के मत वाढवायचे आहे. बूथ कार्यकर्ता भाजपाचा प्राण आहे. मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणि काँग्रेसमध्ये ते मजदूर आहेत," असा टोला शाह यांनी लगावला. "त्या मजुरांना घेऊन या शत्रूचे प्राण हरण करा. बुधथवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांना खाली करा," असं आवाहन शाह यांनी कार्यकर्त्यांना केलं.
नक्की वाचा >> 'लिंगपिसाटांचे एन्काऊंटर होते, पण घटनाबाह्य सत्तापिसाट...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल! म्हणाले, 'महाराष्ट्रातील...'
तिकीट कापले गेले तर
"आपल्यातले सर्व मतभेद दूर करा. भाजपचा चांगला कार्यकर्ता तोच ज्याला समजूत घालण्याची गरज पडत नाही. एका तिकीटासाठी 10 जण असतात. तिकीट कापले गेले तर कोणी तुमची समजूत घालायला येणार नाही. तिकीट कापले तरी नाराज होऊ नका. तिकीट कापले तरी वाद होईल अशी परिस्थिती निर्माण करू नका," असं अमित शाहांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. तसेच, "बाहेरून आले आलेले कार्यकर्ते तुमच्या वरती काम करायला आलेले नाही. ते तुमच्यासोबत काम करायला आलेत," असंही शाह म्हणाले.