Uddhav Thackeray Shivsena On CJI Chandrachud Meeting: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी सायंकाळी सव्वासहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपास येथे पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. या घटनेनंतर राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच आता या प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेताना थेट देशातील न्यायसंस्थेच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या सरन्यायाधीशांचा उल्लेख करत टीका केली आहे. "सरन्यायाधीश चंद्रचूड हे मुंबईत मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांबरोबर चहापान करीत असतानाच बदलापूर बलात्कार कांडातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस चकमकीत मारला गेल्याचे वृत्त आले," असा उल्लेख करत ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रे कलानगर येथील नवीन प्रस्तावित जागेचा भूमीपूजन सोहळ्याच्या दिवशीच अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर झाल्याकडे लक्ष वेधलं आहे. 'सामना'च्या अग्रलेखामधून ठाकरेंच्या शिवसेनेनं अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर भाष्य करतानाच चंद्रचूड यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याच्या मुद्द्यावरुन टीका करण्यात आली आहे.
"बदलापूर प्रकरणातील एखादे ‘एन्काऊंटर’ म्हणजे न्याय असे समजणे धूळफेक ठरेल. मुळात अक्षयची ‘चकमक’ वगैरे नेहमीप्रमाणे संशयास्पद आहे. गृहमंत्री फडणवीस व त्यांच्या मिंध्यांना या बलात्कार कांडातील मुख्य सूत्रधारांना वाचवायचे आहे. ज्या शैक्षणिक संस्थेत हे अधम कृत्य घडले त्या शाळेचे संचालक आपटे, कोतवाल वगैरे लोक भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. अक्षय शिंदे याने त्याच्या जबानीत नक्की काय सांगितले व त्यातले किती पोलिसी कागदावर आले हे गुलदस्त्यात आहे. पुन्हा या शाळेतील महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज गायब केले गेले आहे आणि ते काही अक्षय शिंदेने केले नाही. त्यामुळे शिंदे याच्यामागचे सूत्रधार या सरकारने सुरक्षित केले," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
"जनतेच्या दबावानंतर (बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात) संस्था चालक, कर्मचारी यांच्यावर ‘पोक्सो’ कायद्याखाली गुन्हे दाखल झाले, मात्र त्यांना फडणवीस-शिंदे कृपेने अटक झाली नाही. त्यांना अटक झाली असती ती अक्षय शिंदेच्या जबानीवर. आता त्या अक्षय शिंदेलाच ठार करून आपटे, कोतवाल, आठवले यांना वाचविण्यात आले. हे आपल्या राज्यातील कायद्याचे धिंडवडे आहेत. हे धिंडवडे निघत असताना सरन्यायाधीश चंद्रचूड हे घटनाबाह्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबरोबर हास्यविनोद करतानाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. "महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेचा खटला याच सरन्यायाधीशांसमोर सुरू आहे. शिवसेना व धनुष्यबाण कोणाचे? याचा निकालही सरन्यायाधीश चंद्रचूड यांना द्यायचा आहे. तीन वर्षे ते यावर खल करीत आहेत व तारखांचा घोळ घालीत आहेत. ज्यांच्या विरोधात हा खटला आहे ते पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी मोदकाचा प्रसाद घेण्यासाठी येतात व या खटल्यातील मुख्य आरोपी एकनाथ शिंदे व अजित पवारांबरोबर हास्यविनोद करताना आमचे सरन्यायाधीश दिसतात तेव्हा डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेची चिंता वाटते," असा उल्लेख 'सामना'च्या अग्रलेखात आहे.
नक्की वाचा >> 'लिंगपिसाटांचे एन्काऊंटर होते, पण घटनाबाह्य सत्तापिसाट...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल! म्हणाले, 'महाराष्ट्रातील...'
"महाराष्ट्राच्या बाबतीत सध्या जे घडवले जात आहे ते भयंकर आहे. राज्यात जसे लिंगपिसाट आहेत तसे सत्तापिसाटही आहेत. लिंगपिसाटांचे एन्काऊंटर होते, पण घटनाबाह्य सत्तापिसाट खोक्यांवर उभे राहून सरन्यायाधीशांशी हास्यविनोद करतात. कायद्याची भीती राहिलेली नाही व न्यायदेवता खोकेबाजांची बटीक बनली आहे. महाराष्ट्रातील एकूणच माहोल विद्यमान सत्ताकाळात बिघडला आहे," असं ठाकरेंच्या पक्षाच्या मुखपत्रात म्हटलं आहे.