Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024:  महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत प्रचंड उलधापालथ झालीय. नव्या आघाड्या तयार झाल्या, राजकीय पक्ष फुटले, राजकीय घडामोडींनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. पाच वर्षानंतर महाराष्ट्रात पुन्हा विधानसभेसाठी मतदान झालंय.या सगळ्या पाच वर्षांतील राजकीय उलथापालथींचाच उद्या निकाल आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वाचे टप्पे आपण पाहिले असतील. मात्र 2019 ते 2024 ही पाच वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी होती.महाराष्ट्राच्या राजकारणात वादळं आणणाऱ्या या पाच वर्षांनी राजकारणातील आडाखे, ठोकताळे धुळीस मिळवले. राजकीय पंडितांची सगळी गणितांची मांडणीच मोडीत काढणाऱ्या या पाच वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळ्या वळणार आणून ठेवलं. राज्याच्या राजकारणातील वादळी 5 वर्षांचा आढावा घेऊया.


सत्तानाट्याच्या 38 दिवसांच्या अंकाला सुरुवात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना-भाजपची महायुती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी अशा निवडणुका झाल्या. फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात शिवसेना खिशात राजीनामे घेऊन फिरत होती. निवडणुकीच्या निकालात भाजप स्वबळावर जादुई आकडा गाठत नाही कळल्यावर शिवसेनेनं अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. भाजपनं आक्रमक पवित्रा घेतल्यावर संजय राऊतांनी शिवसेनेसमोर सर्व पर्याय खुले असल्याचं सांगितलं.इथूनच महाराष्ट्रातील सत्तानाट्याच्या 38 दिवसांच्या अंकाला सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नव्या मांडणीची ही सुरुवात होती. 


उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत 


उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. सत्तेच्या मांडणीची चर्चा सुरु असताना 23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसह शपथ घेतली. फडणवीसांचं हे सरकार फक्त अडीच दिवसांचं होतं. अजित पवारांनी शरद पवारांकडं घरवापसी केली होती. 


नाना पटोलेंचा राजीनामा


28 नोव्हेंबर 2019 ला महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. ठाकरे सरकार सत्तेवर येऊन दोन महिने होत नाही तोच जगभरात कोरोनाची साथ आली. उद्धव ठाकरे सरकारनं कोरोनाचा सामना केला. पण याच काळात ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं होतं. याच दरम्यान नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.


बंडाची ठिणगी पडली 


10 जून 2022 रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेना नेते संजय पवार यांचा पराभव झाला. त्या पाठोपाठच म्हणजे 20 जून 2022 रोजी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंचा पराभव झाला. महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फाटाफूट उघड झालेली असतानाच एकनाथ शिंदेच्या बंडाची ठिणगी पडली. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या समर्थक आमदारांसह सूरत गाठलं होतं. सुरुवातीला 17-18 आमदार सूरतला गेले होते. त्यांना पुढं आणखी काहीजण त्यांना सामील झाले. तिथून शिंदेंनी मुक्काम गुवाहटीला हलवला. 



शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ


29 जून 2022 रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. दुसऱ्याच दिवशी महायुती सरकार सत्तेत येणार हे स्पष्ट झालं. महायुती सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता निर्माण झाली. देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा असताना एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.


चिन्ह, नाव एकनाथ शिंदेंचे


30 जून 2023 रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरु झाली. 8 ऑक्टोबर 2022ला शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवण्यात आलं. शिवसेना हे नावही वापरण्यास मनाई करण्यात आली. पुढं 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगानं पक्षचिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदेंचा असल्याचा निकाल दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे नाव आणि मशाल हे चिन्हं देण्यात आलं.


राष्ट्रवादीतही काही अलबेल नाही 


शिवसेना फुटल्यानंतर राष्ट्रवादीतही काही अलबेल दिसत नव्हतं. शरद पवारांनी 2 मे 2023 मध्ये राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केलं. पुढं शरद पवारांनी चारच दिवसांत राजकीय निवृत्तीचा निर्णय माघारी घेतला. पण यामुळं अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दरी निर्माण झाली होती पुढं 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवारांनी महायुती सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.


भाजपचीही लोकसभा निवडणुकीत जबरदस्त पिछेहाट


शिवसेनेप्रमाणं राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला. निवडणूक आयोगानं घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना दिला. शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आलं. शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत पायाला भिंगरी लावून प्रचार केला. शरद पवारांनी लोकसभेच्या आठ जागा जिंकल्या. तर अजित पवारांना अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला 9 जागा मिळाल्या. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 7 जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपचीही लोकसभा निवडणुकीत जबरदस्त पिछेहाट झाली.


5 वर्षांतील राजकीय उलथापालथींचाच निकाल


राज्यातील गेल्या पाच वर्षांमधील राजकीय उलथापलथीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलंय. त्याचा काही तासांममध्ये निकाल लागणाराय.महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडी, वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांची मैत्री पाहिली.आता पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार आहे याची प्रचंड उत्सुकता निर्माण झालीय.  या सगळ्या पाच वर्षांतील राजकीय उलथापालथींचाच उद्या निकाल आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.