`प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं, पण...` मुख्यमंत्री पदाबद्दल नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
zee 24 taas वर `जाहीर सभा` कार्यक्रमात विधान परिषदेच्या आमदार आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पंकजा यांना महाराष्ट्रातील राजकारण आणि त्यांच्या राजकीय संघर्षावर अनेक प्रश्न विचारण्यात आले. ज्याची पंकजा यांनी बेधडक उत्तर दिली.
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा 2024 चं बिगुल वाजलं असून राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निमित्ताने zee 24 taas वर 'जाहीर सभा' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विधान परिषदेच्या आमदार आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पंकजा यांना महाराष्ट्रातील राजकारण आणि त्यांच्या राजकीय संघर्षावर अनेक प्रश्न विचारण्यात आले. ज्याची पंकजा यांनी बेधडक उत्तर दिली.
2014 महाराष्ट्र विधानसभेच्यावेळी भाजप- शिवसेनेच सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरु असताना पंकजा मुंडे यांनी 'मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री' असं म्हटल होतं. मात्र यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पंकजा यांनी मंत्री म्हणून महिला बालविकास मंत्रालयासारखी अनेक खाती सांभाळली. परंतु महाराष्ट्र विधानसभा 2019 आणि लोकसभा 2024 च्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यादरम्यान राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा पंकजा यांना संघर्ष करावा लागला. मात्र आजही पंकजा यांचे कार्यकर्ते त्यांचा अनेक ठिकाणी 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख करताना दिसतात. यावरच zee 24 taas च्या प्रतिनिधींनी जाहीर सभा या कार्यक्रमात पंकजा यांना मुख्यमंत्री पदाबद्दल प्रश्न विचारला यावर पंकजा यांनी सूचक उत्तर दिलं.
मुख्यमंत्री होण्याबाबत काय म्हणाल्या पंकजा?
मुख्यमंत्री पदाबद्दल बोलताना पंकजा म्हणाल्या की, 'प्रत्येक गटाचे कार्यकर्ते असतात आणि त्यांना वाटतं असतं की आपला नेता मोठा व्हावा. कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे पण तसं आम्हाला वाटायला हवं. आम्हाला कळतं की आम्ही कुठे उभे आहोत. त्याच्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही'. यावरून पंकजा मुंडे या सध्यातरी मुख्यमंत्री पदासाठी फार उत्सुक नसल्याचं पाहायला दिसतंय.
आर्यमन पालवे राजकारणात येणार का?
आर्यमन पालवे राजकारणात येणार का? असा प्रश्न सुद्धा zee 24 taas च्या जाहीर सभेत पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी आर्यमन याच्या दसऱ्या मेळाव्याच्या उपस्थितीचा उल्लेख केला. आर्यमन हा भगवान भक्तीगडावर दर्शनासाठी आला होता. मी फक्त उपस्थितांमध्ये त्याचे नाव घेऊन सर्वांना त्याची ओळख करुन दिली. आर्यमन हा अजून शिक्षण घेत आहे. तो त्याचे शिक्षण पूर्ण करेल यानंतर तो व्यवयास करेल. मात्र, भविष्यात तो राजकारणात येईल की नाही ते त्यावेळच्या राजकीय परिस्थीतीवर तसेच त्याच्या निर्णयावर अवलंबून असेल असा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला आहे.