महाराष्ट्रातील `या` गावात औषधी गुणधर्माचे गरम पाण्याचे कुंड, जणू निसर्गाचा चमत्कारच
Maharashtra Hidden Places: निसर्गाचा चमत्कार म्हणावा असे एक ठिकाणी महाराष्ट्रात आहे. या गावात गरम पाण्याचे झरे आहेत. जाणून घ्या याबाबत सविस्तर
Maharashtra Hidden Places:महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची खास स्पेशालिटी आहे. नाशिकची द्राक्षे, कोल्हापुरचा तांबडा-पांढरा रस्सा, नागपुरची संत्रे हे तिथले पदार्थ व वस्तु जगप्रसिद्ध आहेत. तशीच तिथली ठिकाणही खूप प्रसिद्ध आहेत. तसंच, पालघर जिल्ह्यातील वज्रेश्वरी-अकलोली या गावात निसर्गाचा चमत्कार म्हणावा असे निसर्गसौंदर्य लाभले आहे. या गावात गरम पाण्याचे झरे आहेत. महाराष्ट्रात एकूण 28 गरम पाण्याचे कुंड आहेत. त्यातील 18 कोकणात आहेत. विशेष म्हणजे वज्रेश्वरी येथील गरम पाण्याच्या कुंडात औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते.
अकलोली आणि वज्रेश्वरी हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील दोन गावे आहेत. शेजारी- शेजारी असलेली ही गावे निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत. मुंबईपासून अवघ्या 80 किमी अंतरावर हे गाव तानसा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. अकलोली-वज्रेश्वरीच्या बाजूलाच गणेशपूरी आणि निंबवली ही गावे आहेत. यागावातही गरम पाण्याचे झरे आढळतात.
गरम पाण्याचे झरे हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. उन्हाळा असो किंवा पावसाळा येथील पाण्याची पातळी कायम समना असते. तसंच पाण्याच्या तापमानातही अजिबात फरक पडत नाही. सर्व ऋतुमझ्ये येथील पाणी गरमच राहते. तसंच, बाराही महिने हे गरम पाण्याचे झरे सुरूच असतात. या झऱ्यांना कुंडाच्या आकारात बांधून त्यात स्नान करण्यासाठी व हात पाय धुण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
भिवंडी तालुक्यात असलेल्या गरम पाण्याचे झरे हे आरोग्यासाठी गुणकारी मानले जातात. या पाण्यात स्नान केल्यास त्वचारोग दुर होतात, असा दावा केला जातो. अकलोली येथील गरम पाण्याचे कुंडे जगप्रसिद्ध आहेत. येथील शिवमंदिरालाही पौराणिक महत्त्व प्राप्त आहे. शिवमंदिरासमोरच हे गरम पाण्याचे कुंड आहेत. तसंच, तानसा नदीच्या किनाऱ्यावर गरम पाण्याची सात कुंड आहेत. या कुंडावर पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. वज्रेश्वरी येथे देवीचे मंदिरही आहे. त्यामुळं पर्यटन या भागात मोठी गर्दी करतात. गरम पाण्याचे झरे पर्यटकांना आकर्षित करतात.
गरम पाण्याचे झरे औषधी
गरम पाण्याच्या झऱ्यात गंधकाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळं या पाण्यात स्नान केल्याने त्वचारोग बरा होतो. हे पाणी त्वचारोगासाठी गुणकारी असल्याचे सांगितले जाते.