Maharashtra Weather News : किनारपट्टीसह पश्चिम घाटात सरीवर सरी; मुंबईत मात्र काळ्या ढगांचा चकवा, पाऊस गेला तरी कुठं?
Maharashtra Weather News : जून महिना संपायला आला तरी अपेक्षित पाऊस न झाल्यामुळं चिंतेत भर... कुठं बळीराजा सुखावला, तर कुठं वाढली त्याची चिंता. धरण क्षेत्रांमध्ये नेमकी स्थिती काय? पाहा हवामान वृत्त...
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येराज्याच्या कोकण किनारपट्टी भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. तर, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहणार आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असला तरीही प्रत्यक्षात मात्र शहरात पावसाची चिन्हं अजिबातच पाहायला मिळत नाहीयेत. दिवस पुढे जातो तसतसा शहरात सूर्यनारायण आणखी प्रखर किरणांनी नागरकांना हैराण करत आहे. वातावरणात होणाऱ्या या बदलामुळं सध्या शहरात आजारपणाचं सावटही स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. त्यामुळं आता मुंबईकरांसाठी पावसाची ही प्रतीक्षा आणखी किती लांबणार हाच प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत.
जून महिनासुद्धा संपण्याच्या मार्गावर असताना आता मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये येत्या काही दिवसांत पावसानं सातत्य राखलं नाही मोठं पाणीसंकट ओढावणार आहे, ही वस्तुस्थिती.
महाराष्ट्रातील 'या' भागात सरीवर सरी
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या किनारपट्टी भागासह पश्चिम घाट परिसरात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. दक्षिण गुजरातवरून वाहणाऱ्या हवेच्या वरील स्तरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तर, बंगालच्या किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे.
हेसुद्धा वाचा : विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?
राज्यातील हवामानाची ही एकंदर स्थिती पाहता रायगड, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी भागाला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबारला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, आयएमडीनं देशभरातील हवामानाचा आढावा घेत वर्तवलेल्या अंदाजानुसार आसामपासून खालच्या दिशेला निघणाऱ्या भागामध्ये चक्रिवादळसदृश्य परिस्थिती तयार झाली असून, त्यामुळं पुढील 5 दिवसांमध्ये पश्चिम बंगाल आणि सिक्कीम , अरुणालच प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा या भागांमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.