विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?

येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 24, 2024, 06:49 PM IST
विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?   title=

Ajit Pawar Vs Sharad Pawar : येत्या काळात राष्ट्रवादी पक्षात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करु शकतात. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदारांसाठी शरद पवार गटात प्रवेशासाठी दारं खुली आहेत. 

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

अजित पवारांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही असं मोठं विधान शरद पवारांनी केले आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नवीन चेह-यांना संधी दिली जाणार आहे.मुंबईमध्ये अध्यक्ष शरद पवार यांनी ही माहिती दिली. सोडून गेलेल्या आमदारांच्या जागी नवीन चेहरे दिले जाणार आहेत. तसंच नवीन चेह-यांना संधीबाबत पक्षात सकारात्मक वातावरण असल्याचंही पवार म्हणाले. पक्षाकडे नवे चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेह-यांना संधी देऊ असं त्यांनी सांगितलं. शरद पवार यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करत अजित पवार गटाच्या आमदारांना प्रवेशासाठी विधानसभा निवडणुकीत संधी देण्याची ऑफर दिली आहे. 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते शरद पवारांच्या पक्षात परत जाणार का याची पुन्हा चर्चा सुरु झालीय. कारण संपर्कात आहेत ते येणारच आहेत.. मला  आकडा विचारु नका असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलंय.. तेव्हापासूनच अजित पवार गटातील नेते शरद पवार गटात घरवापसी करण्याबाबतच्या चर्चांना उधाण आलंय.

शरद पवारांचं नाव घेत अजित पवार भावुक झाले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवारांचं नाव घेत अजित पवार भावुक झालेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन मुंबईत पार पडला. यावेळी अजित पवारांनी शरद पवारांचं कृतज्ञतापूर्वक नाव घेतलं. त्यावेळी अजित पवारांचा कंठ दाटून आला.. गेली 24 वर्ष शरद पवारांनी पक्षाचं नेतृत्व केलं, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो..  असं म्हणताना अजित पवार भावुक झाले...तर सोडून गेलेल्यांचंही पक्षवाढीसाठी मोठं योगदान असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुक आयोगाला पत्र

शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुक आयोगाला पत्र देण्यात आलंय. फ्री सिम्बॉल मधून पिपाणी चिन्ह वगळण्याची  विनंती या पत्राद्वारे करण्यात आलंय. लोकसभेला पिपाणी चिन्हामुळे जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दक्षता घेतली जातेय. फ्री सिम्बॉल मध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा समावेश असल्यामुळे अडचणी येतं  असल्याचा पत्रात उल्लेख केलाय.