Maharashtra Weather News: दिवसा उकाडा, रात्री गारठा...; मुंबईसह राज्यात `या` दिवशी वाढणार थंडी
Weather Forecast: हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 14 डिसेंबरनंतर राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. यावेळी तापमानाचा पारा सामान्यपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे.
Weather Forecast: महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आता कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. उर्वरित आठवड्यातही थंडी कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईत देखील रात्रीच्या वेळेस गारठा जाणवू लागला आहे. तर या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्रात हिवाळा परतण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 14 डिसेंबरनंतर राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. यावेळी तापमानाचा पारा सामान्यपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे.
पुण्यातील हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 16-17 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उत्तरेकडील वाऱ्याचा प्रभाव दिसून येणार आहे. त्यामुळे बहुतांश भागात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे. हे वारे बंगालच्या उपसागरातून दक्षिण द्वीपकल्पातून येतात. ही स्थिती 16-17 डिसेंबरपर्यंत राज्यात कायम राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील काही भागात तापमान येणार खाली
उत्तर-मध्य महाराष्ट्र वगळता राज्यातील बहुतांश भागात रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा 2 ते 3 अंशांनी खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या काळात मुंबई आणि पुण्यातील रात्रीच्या तापमानात घट होणार असल्याचंही म्हटलं जातंय. यावेळी रात्री दिवसांपेक्षा जास्त गारवा असू शकतो.
मुंबईतील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे मुंबईतील रात्रीचे तापमान 18 ते 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मुंबईकरांना रात्रीच्या वेळेस चांगल्याच कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे.
मुंबईत कमाल तापमान अजूनही अधिक आहे. सकाळी कडाक्याची थंडी, दुपारी धुकं आणि कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागतोय. तर दुसरीकडे उपनगरात किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे.
उत्तरेकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढणार असून त्यामुळे मुंबईतील रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबरपर्यंत रात्रीचे तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येणार आहे. तर 15 आणि 16 डिसेंबर रोजी पारा 19 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकतो. या काळात उत्तरेकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढणार असून त्यामुळे मुंबईतील रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे.