Maharashtra Weather : देहरादून नव्हे, हे तर धुळे; सोसाट्याचा वारा, गारपीटीनं महाराष्ट्राला झोडपलं
Maharashtra Weather : पावसानं सध्या महाराष्ट्रात अनपेक्षित हजेरी लावली आणि अनेकांचीच तारांबळ उडाली. भरीस आलेली पिकं गमवावी लागणार, या विचारानं शेतकरी हवालदिल झाला.
Maharashtra Weather : आठवड्याच्या सुरुवातीपासूनच अनेकांनाच हवामान बदलांना सामोरं जावं लागलं आहे. एकिकडे होळीचा उत्साह असतानाच दुसरीकडे हवामान विभागानं नागरिकांना सतर्क करत आगामी दिवसांमध्ये हवामानाची नेमकी काय परिस्थिती असेल याची माहिती दिली. अचानक बदललेल्या हवामानामुळं मुंबई (Mumbai Rains) आणि उपनगरांमध्ये सोमवारी सायंकाळी आणि रात्री उशिरानं सोसाट्याचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. तर, काही भागांमध्ये पावसानंही हजेरी लावली. ठाणे, कल्याण (Kalyan), डोंबिवली, नवी मुंबई (Navi mumbai) इथं पावसाच्या तुरळक सरी बरसल्या.
दरम्यान 8 मार्चपर्यंत हवामानाची हीच परिस्थिती राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री उत्तर मध्य महाराष्ट्रावरून ढग पुढे जाताना दिसले ज्यामुळं ठाणे, कल्याण आणि इतर भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
मराठवाड्यात गारपीट
पश्चिमी झंझावातामुळं अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ज्यामुळं अवकाळी पाऊस होत असल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे. परिणामी 9 मार्चपर्यंत मुंबई, कोकण वगळता मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा देण्यात हवामान खात्यानं दिला आहे. तर मुंबई ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीडमध्येही आजच्या दिवसात पावसाची शक्यता आहे.
हेसुद्धा वाचा : Holi Special Train 2023: रेल्वे विभागाकडून होळीनिमित्त कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन; कधी- कुठून सुटणार? पाहा...
धुळ्यात तुफान गारपीट
तिथं धुळे जिल्ह्यातल्या तुफान गारपिटीमुळे रब्बी हंगामी पिकांचं मोठं नुकसान झालं. धुळ्यातील साक्री तालुक्यात गारपिटीनं अक्षरशा पिकांना भुईसपाट केलं. शेतं आणि रस्त्यावर गारांचा खच पडला. सोशल मीडियावर हे फोटो पाहताना अनेकांनाच प्रथमदर्शनी ते उत्तराखंड किंवा हिमाचल प्रदेशातील रस्त्यांचे फोटो वाटले, इतक्या गारा रस्त्यांवर पाहाला मिळत होत्या.