Maharashtra Weather News : देशभरात सध्या बहुतांश राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून, हा पाऊस येत्या दिवसांमध्ये आणखी वाढणार की काढता पाय घेणार याकडेच अनेकांचं लक्ष लागलं आहे. पावसाचं एकंदर प्रमाण पाहता गुजरात आणि केरळमध्ये परिस्थिती बिघडताना दिसत आहे. गुजरातमध्ये काही भागांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आलं असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार या भागांमध्ये 15 हजारांहून अधिक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिथं गुजरातमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असतानाच इथं महाराष्ट्रात मात्र पावसाची संमिश्र स्थिती पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, तिथं पावसाचं अर्थात मान्सूनचं प्रमाण वाढलेलं असतानाच इथं महाराष्ट्रातील पर्जन्यमानात घट झाली आहे. ज्यामुळं राज्याच्या काही भागांमध्ये मागील 24 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा असूनही पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. 


पुढील 24 तासांमध्येही राज्यात स्थिती काहीशी अशीच राहणार असून, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाची रिपरिप आणि अधूनमधून पडणारा लख्ख सूर्यप्रकाश अशी हवामानाची एकंदर स्थिती पाहायला मिळणार आहे. तर, विदर्भात मात्र पावसाच्या मुसळधार सरींचा अंदाज आहे. राज्यातील पश्चिम भागामध्ये घाटमााथ्यावरील क्षेत्रामध्ये पावसाची दमदार हजेरी राहणार असून, मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसासाठी पूरक वातावकरण निर्मिती होणार आहे. पण, असं असलं तरीही गुजरातमधील कमी दाबाचा पट्टा आणखी किती तीव्र होतो यावर महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण अवलंबून असू शकतं. 


हेसुद्धा वाचा : अब तक 13! कूनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्याचा मृत्यू, आता कारण ठरलं...


 


हवामान विभागाच्या मुंबई केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


राज्यात सध्या बहुतांश भागांमध्ये पावसाची ये- जा सुरू असल्यामुळं या श्रावणसरीच असल्याचं आता स्पष्ट होत आहे. अधूनमधून डोकावणारी सूर्याची किरणं आणि मध्येच दाटून येणारे पावसाचे काळे ढग अशी हवामानाची एकंदर स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनीही वर्तवला आहे. 


चक्रीवादळाचाही इशारा? 


तिथं गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन त्याचं वादळात रुपांत होण्याची भीती असतानात इथं राजस्थानमधूनही एक वादळी प्रणाली अरबी समुद्राच्या दिशेनं पुढे सरकताना दिसत आहे. ही संपूर्ण प्रणाली झारखंडचा वायव्य भाग आणि नजीकच्या भागावर परिणाम करणार असून, तिथून उत्तर प्रदेशवरून पुढे जाताना ही प्रणाली अधिक विरळ होताना दिसणार आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वेला कमी दाबाचा पट्टा नव्यानं तयार होण्याची शक्यता आहे.