Maharashtra Weather News : वादळी वारे अन् काळ्या ढगांची दाटी... विदर्भ, मराठवाड्यासह कोणत्या भागांना पावसाचा धोका?
Maharashtra Weather News : महाराष्ट्र आणि गोव्यासह सध्या देशातील दक्षिणेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra Weather News : शनिवारपासून जोर धरलेल्या पावसानं राज्यात अद्यापही उसंत घेतलेली नसून, पुढील 24 तासांमध्येसुद्धा राज्याच्या विदर्भ आणि मराठवाड्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातही परिस्थिती काहीशी अशीच काहणार असून, पूर्व विदर्भासह तेलंगणावर सक्रिय असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं ही परिस्थिती उदभवत असल्याचं सांगितलं जात आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या अरबी समुद्राच्या वायव्य भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, गुजरातपासून केरळपर्यंत त्याचे परिणाम दिसून येत आहेत. देशभरात सक्रिय असणाऱ्या याच हवामान प्रणालीचे थेट परिणाम मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भावर दिसून येत असून कोकणाच्या तुलनेत इथं पुढील 48 तासांमध्ये अधिक पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागानं याच धर्तीवर संभाजीनगर, जालना, परभणीसह सातारा आणि पुण्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यानच्या काळात कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात पावसाचं हे संकट आणखी गडद होताना दिसणार असून, इथं ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहणार असून, पावसाची हजेरीही पाहता येणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हेसुद्धा वाचा : रेल्वेच्या मासिक पासपेक्षाही महागली कोथिंबीर; एका जुडीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कम
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या सरी अधूनमधून बरसणार असून, वातावरण ढगाळ राहील. तर, ठाणे, पालघर भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, इथंही पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज आहे.
अनेक गावांचा संपर्क तुटला
सोमवारी झालेल्या दमदार पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यासह खान्देशातील अनेक गावांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. कुठे वाहनं पाण्याखाली गेली, तर कुठे प्राणी वाहून गेल्याच्याही घटना घडल्या. शेतशिवारात पाणी शिरून पिकांचा चिखल झाला आणि अनेक गावांचा संपर्क तुटला. सोमवारी झालेल्या या पावसामुळे सदर भागात जनजीवन विस्कळीत झालं.