Maharashtra Weather News : मान्सूनची गोव्यापर्यंत मजल; मुंबईसह कोकणात मान्सूनपूर्व सरींना सुरुवात
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात कधी पोहोचणार मान्सून? उरले फक्त काही तास.... महाराष्ट्राच्या वेशीवर मान्सून धडकण्यास पोषक वातावरण. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील उकाडा आता बहुतांशी कमी होणार असून, त्यास कारण ठरणार आहे ते म्हणजे मान्सूनचं आगमन. सध्या राज्याच्या काही भागांमध्ये असणारा उकाजडा वगळला तर, मागील 24 तासांमध्ये अनेक जिल्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं. थोडक्यात सध्या राज्यात मान्सूनपूर्व वातावरणासाठी पूरक स्थिती निर्माण होत असून, परिणामस्वरुप दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 50 ते 60 किमी वेगानं वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
फक्त दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रच नव्हे, तर विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इथं मुंबईत मागील 24 तासांपासून पावसाळी वातावरण पाहायला मिळालं असून, गुरुवारी सकाळपासूनच मुंबईत पावसाची रिपरिप सुरू आहे.
मान्सून कुठे पोहोचला?
हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून गोव्यामध्ये दाखल झाला असून, या स्थितीमुळं राज्याच्या कोकण, पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या तळ कोकणात पावसाच्या सरी बरसत असून, या संपूर्ण वातावरणामुळं हवेत गारवा निर्माण झाला आहे.
हेसुद्धा वाचा : 'मोदी स्वतःला हिंदूंचे नवे शंकराचार्य..', ठाकरे गटाची सडकून टीका; म्हणाले, '400 पारचा नारा..'
मान्सूननं आतापर्यंत गोव्यापर्यंतचा भाग व्यापला असून, कर्नाटकच्या उर्वरित भागातही मान्सूनची हजेरी पाहायला मिळाली आहे. याशिवाय अरबी समुद्रातील बहुतांश क्षेत्र व्यापणाऱ्या या मान्सूननं तेलंगणातही हजेरी लावली आहे.
सध्याच्या घडीला मान्सूनची एकंदर वाटचाल आणि त्यासाठीचा वेग पाहता या आठवड्यातच तो महाराष्ट्रात दाखल होताना दिसेल. मान्सूनच्या आगमनानंतर मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदजा वर्तवण्यात आला आहे.