Maharashtra Weather News : भर हिवाळ्यात पावसाचं सावट; आज कोणत्या भागांमध्ये यलो अलर्ट?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल. थंडीनं दडी मारल्यामुळं राज्यात तापमानवाढ. पाहा पुढील 24 तासांसाठी काय आहे अंदाज...
Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरातील वादळी वारे आणि देशाच्या उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी यामुळं देशात सध्या हवामानाची क्षणाक्षणाला बदलणारी स्थिती पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात बहुतांश भागांमधून थंडीनं काढता पाय घेतल्यानं चिंतेत भर पडताना दिसत आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्याच्या काही भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये कोकण पट्टा आणि नजीकच्या क्षेत्रामध्ये तुलनेनं अधिक तापमानवाढीची नोंद करण्यात आल्यामुळं या भागांवर पावसाळी ढगांचं सावट पाहायला मिळत आहे. तर, दक्षिण महाराष्ट्रातील भागाला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. इथं मुंबई शहर आणि उपनगरातही उन्हाचा दाह सहन करावा लागणार असून, ढगांचं सावट असलं तरीही उष्मा मात्र कमी होणार नाही असा स्पष्ट इशारा हवामान विभागानं दिला आहे.
हेसुद्धा वाचा : सर्वात मोठी बातमी; ED ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश
देशात सध्या थंडीचा कडाका उत्तरेकडील राज्यांकडे वाढत असला तरीही दक्षिणेकडील राज्यांमध्ये मात्र किनारपट्टी क्षेत्रानजीक समुद्रात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती होताना दिसत आहे. तर अतीव उत्तरेकडे असणाऱ्या काश्मीर खोऱ्यामध्ये हिमवृष्टीसाठी पूरक वातावरण पाहायला मिळत आहे. उत्तरेकडे वाढणाऱ्या थंडीच्या कडाक्यामुळं 8 डिसेंबरनंतर शीतलहरी वेगानं मध्य भारताच्या दिशेनं येणार असून, दरम्यान येणाऱ्या राज्यांमध्ये तापमानात घट नोंदवण्यात येईल.
महाराष्ट्रातही पावसाचं सावच पुढील 48 तासांमध्ये दूर होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर कोरडे वारे आणि तापमानातील घट अशी स्थिती पाहायला मिळू शकते. तूर्तास राज्यात भर हिवाळ्यात पावसाचं सावट ही वस्तूस्थिती मात्र नाकारता येत नाही.