Maharashtra Weather News : बुधवारी मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा असतानाच शहरात मात्र पावसानं तुरी दिल्याचं पाहायला मिळालं. एखाद दुसरी सर वगळता पावसानं लपंडाव सुरूच ठेवला. गुरुवारीसुद्धा हवामानाची अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळणार असून, शहरासह उपनगरांमध्ये काळ्या ढगांची दाटी मात्र सातत्यानं होणार असून, मधूनच सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यतेसह सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश राहील असा अंदाज हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं वर्तवला आहे. दरम्यान या भागांमध्ये अधूनमधून 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शहरातील एकंदर स्थिती पाहता तापमान कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30°C आणि 26°C च्या दरम्यान असेल. 


तिथं कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा दुप्पट ताकदीनं सक्रिय झालेला असतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा धीम्या गतीनं पावसासाठी वातावरण पूरक होताना दिसत आहे. 


हेसुद्धा वाचा : उड्डाणपुलाच्या डोक्यावरुन धावणार मेट्रो; मुंबई महानगरातील पहिला डबल डेकर पूल, वाहतूककोंडी फुटणार



 


पुढील 24 तासांसाठी कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या गुजरातच्या दक्षिणेपासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. असं असतानाच महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यात तापमानवाढीस सुरुवात झाल्याचं स्पष्ट होत आहे. पुढील 48 तास हे चित्र कायम राहणार असून, शुक्रवारपासून पुन्हा एकदा पाऊस जोर धरणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.