Mumbai Rain Today: महाराष्ट्रासह मुंबईत पावसाने जोर धरला आहे. सोमवारी मुंबईत काहीच तास झालेल्या पावसामुळं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबई व उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. त्यानंतर संपूर्ण आठवडा मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच आहे. शुक्रवारी 12 जुलै रोजीदेखील मुंबईकरांची सकाळी पावसाने झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज आभाळदेखील भरुन आलं आहे. गुरुवारी रात्रीदेखील मुंबई, ठाण्यास जोरदार पाऊस झाला होता. पुढील काही दिवसही मुंबईकरांसाठी धोक्याचे ठरु शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांचा विकेंड पावसातच जाणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मुंबईत मध्यम आणि मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर, पुढच्या आठवड्यात 17,18 आणि 19 जुलै रोजी जोरदार पावसामुळं मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळं पुढच्या आठवड्यात पाऊस मुंबईसह ठाण्यात धुमशान घालणार. असा अंदाज आहे. 


सोमवारी 8 जुलै रोजी मुंबईत 6 तासांत 300 मिलिमीटर पाऊस झाला होता. कमी अवधीत जास्त पाऊस झाल्याने संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती. मुसळधार पावसाचा लोकलचा फटका बसला होता. तसंच, रस्तेमार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तर, हवामान विभागाने रेड अलर्ट दिला होता. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. 


या आठवड्यात दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी रात्री पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी पहाटेदेखील मुसळधार पाऊस बरसत होता. तर आज शुक्रवारीदेखील हवामान विभागाने ठाणे, मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  


या जिल्ह्यांना अलर्ट 


शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, रविवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. सोमवारी, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 


दरम्यान, या आठवड्यातील शुक्रवार, शनिवार आणि रविवार एकूण 300 मिमी पाऊस पडू शकतो. तसंच, 17,18,19 या दिवशी मोठ्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईत पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.