Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडे वाढलेल्या थंडीच्या कडाक्यामुळं महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्येही थंडी वाढताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार  देशात वाहणाऱ्या शीतलहरींचा वेग सध्या अधिक तीव्र झाला असून, त्यामुळं मध्य भारतापर्यंत गारठा अधिकाधिक वाढत आहे. तर, पूर्वोत्तर राज्यांमध्येही किमान तापमानाच घट होऊन काही क्षेत्रांवर पावसाळी ढगांचं सावट पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात कोकण आणि प्रामुख्यानं रत्नागिरीतील तिशीपलीकडे असणारा तापमानाचा आकडा वगळल्यास उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांमध्ये थंडीचा मुक्काम राज्यात कायम राहणार असून, वर्षाच्या अखेरीसही ही थंडी काही पाठ सोडताना दिसणार नाही. 


राज्यात सध्या सर्वाधिक निच्चांकी तापमानाची नोंद धुळे येथे करण्यात आली असून, इथं पारा 4.3 अंशांवर पोहोचला आहे. तर, परभणी, निफाज, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर इथंही थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तिथं विदर्भसुद्धा या थंडीच्या कचाट्यातून सुटला नसून इथं बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंशांच्या खाली असल्याचं सांगण्यात येत आहे. पुढील काही दिवस पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील कोरड्या वाऱ्यांचा झोत अधिकाधिक वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं झेपावत राहिल्यास राज्यावर या हाडं गोठवणाऱ्या थंडीची पकड आणखी मजबूत होणार असून, उत्तर महाराष्ट्र यामुळं सर्वाधिक प्रभावित क्षेत्र असेल. तर, राज्याच्या उर्वरित भागात मात्र थंडीपासून काहीसा दिलासा मिळेल. 


शहरनिहाय तापमान 


मुंबई - किमान 17/ कमाल 33 अंश सेल्सिअस
पुणे- किमान 12/ कमाल 30 अंश सेल्सिअस 
नाशिक - किमान 11/ कमाल 029 अंश सेल्सिअस 
नागपूर - किमान 14/ कमाल 29 अंश सेल्सिअस 
औरंगाबाद- किमान 12/ कमाल 30 अंश सेल्सिअस 
कोल्हापूर- किमान 14/ कमाल 31 अंश सेल्सिअस 
महाबळेश्वर- किमान 14/ कमाल 28 अंश सेल्सिअस 
परभणी- किमान 10/ कमाल 30 अंश सेल्सिअस