Maharashtra Weather News : वादळी वारा, गारपीटीमुळं राज्याच्या `या` भागांत ऑरेंज अलर्ट; `इथं` उन्हाचा तडाखा वाढणार
Maharashtra Weather News : वादळी पाऊस, गारपीट आणि उष्णतेच्या झळा... राज्यात हवामान इतकं बदलतंय की पूर्वानुमान पाहून काहीच सुचणार नाही!
Maharashtra Weather News : सूर्याचा प्रकोप दिवसागणिक वाढत असल्यामुळं राज्यात बाष्पीभवनाच्या प्रक्रियेला वेग आला असून, आता बहुतांश भागांमध्ये पावसासाठी पोषत वातावरण तयार होताना दिसत आहे. राज्याच्या काही भागांमध्ये गारपीटीस पूरक वातावरण परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळं तिथं परिस्थिती बिघडण्याची चिन्हं आहेत. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार सध्या राज्याच्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये गारपीटीसाठी पोषक हवामान असेल.
हवामानाची एकंदर स्थिती पाहता विदर्भाच्या अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वारा आणि पावसाच्या तुरळक सरींची शक्यता पाहता यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वर्ध्यासह विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये हवामान विभागाकडून ताशी 40 ते 50 किमी वेगानं वादळी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळं नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
हेसुद्धा वाचा : मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, माझा नवरा भाजपचा आमदार आहे; अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य
हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश मुख्यतः निरभ्र राहील. शहरांतील वेगवेगळ्या ठिकाणी उष्ण आणि दमट स्तिथीची शक्यता या धर्तीवर वर्तवण्यात आली आहे. देश पातळीवर सध्या छत्तीसगढपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते उत्तर तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं राज्यातील हवामानात हे बदल दिसून येत आहेत. ज्यामुळं पुढील 24 तासांमध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीयरित्या वाढलेलाही लक्षात येऊ शकतो.
राज्यात सध्या उष्णतेची लाट आली असून, सोलापुरात गेल्या 24 तासांतील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली तर, हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अनेक भागांमध्ये उष्ण वारे वाहणार असल्यामुळं हा दाह अधिक सोसावा लागणार आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 ते 41 अंशांहून जास्तच राहणार आहे.