मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, माझा नवरा भाजपचा आमदार आहे; अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

धाराशिवच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील नव्या वादात सापडल्या आहेत. मी कशाला राष्ट्रवादी वाढवू असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

Updated: Apr 7, 2024, 06:21 PM IST
मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, माझा नवरा भाजपचा आमदार आहे; अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य title=

Archana Patil : धाराशिवच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील नव्या वादात सापडल्या आहेत. ज्या राष्ट्रवादी पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली, त्याच पक्षाबाबत त्यांनी वादग्रस्त विधान करत खळबळ उडवून दिली आहे. बार्शीत राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढवणार का असा प्रश्न अर्चना पाटील यांना पत्रकारांनी विचारला होता. तेव्हा मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, माझा नवरा स्वत: भाजपचा आमदार आहे असं विधान अर्चना पाटील यांनी केलंय. 

अर्चना पाटील यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे.. अर्चना पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी घेतलीय. तर त्यांचे पती आमदार राणाजगजितसिंग पाटील हे तुळजापूरचे आमदार आहेत.
धाराशिव लोकसभा उमेदवारीवरुन महायुतीत तणाव वाढला आहे. इथे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरुन शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक आक्रमक झालेत. तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत यांना तिकीट द्यावं अशी मागणी तानाजी सावंतांच्या समर्थकांनी केली आहे. त्याचाच भाग म्हणून भूम, परंडा, वाशी तालुक्यातील शिवसैनिकांनी राजीनामे दिलेत. तसंच राजीनाम्यांची होळीही केली. महायुतीचा धाराशिवचा उमेदवार बदला अशी त्यांची मागणी आहे. 

अर्चना पाटील यांची थेट दीरासोबत लढत

धाराशिव लोकसभा मतदारसंघातून अर्चना पाटील महायुतीच्या उमेदवार असणार आहेत... भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटलांनी आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला.. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांचं स्वागत केलं... धाराशिवमधून त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार असतील, अशी घोषणा तटकरेंनी यावेळी केली.. धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील असा दीर विरुद्ध भावजय सामना रंगणार आहे.. दरम्यान अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच, धाराशिवमध्ये  महायुतीकडून जल्लोष करण्यात आला.