Maharashtra Weather News : उत्तरेकडील राज्यांमध्ये अर्थात काश्मीच्या खोऱ्यासह पर्वतीय क्षेत्रामध्ये कडाक्याची थंडी पडली असून, या भागांमध्ये सध्या 'चिल्लई कलां' अर्थात रक्त गोठवणाऱ्या थंडीचा काळ सुरू झाला आहे. असं असलं तरीही महाराष्ट्रात मात्र हवामानात लक्षणीय बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील तापमानात पुढील 24 तासांमध्ये चढ- उतार अपेक्षित असून, काही ठिकाणी पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीर वगळता उत्तरेकडील हिमाचल, पंजाब यांसारख्या भागांमध्ये तापमानात फरक दिसून आल्यामुळं देशभरातील हवामानात बदल अपेक्षित असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच बंगालच्या उपसागरातील पूर्वमध्य क्षेत्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं या प्रणालीचा सर्वाधिक परिणाम देशाच्या दक्षिण किनारपट्टी क्षेत्राकडे दिसून येणार आहे. दरम्यानच्या काळात धुळ्यापासून परभणी, निफाडपर्यंत किमान तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ अपेक्षित आहे.


राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानाचा आकडा 10 अंशांच्या वर गेला असून, सोलापूर इथं उच्चांती तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण क्षेत्रामध्येही सध्या पश्चिमी झंझावाताचा परिणाम दिसणार असून, त्यामुळं 26 डिसेंबरला पावसाचा इंदाज वर्तवण्यात आला आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा एका क्लिकवर... 


 


साधारण मागील संपूर्ण आठवड्यात थंडीच्या हंगामातील आतापर्यंतच्या निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. आता मात्र पुन्हा किमान तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. आयएमडीच्या माहितीनुसारही की बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात वाढ होऊन थंडीचा कडाका कमी झाला आहे. ज्यामुळं पुढील काही दिवस या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं लक्षणीय हवामान बदल अपेक्षित असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. 


पश्चिमी झंझावातामुळं 25 डिसेंबरपासून आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पुढे 26 ते 28 डिसेंबर दरम्यान मात्र राज्यात हलक्या पावसाच्या सरींची अपेक्षा आहे. इतकंच नव्हे, तर ढगांच्या दाटीवाटीमुळं उष्माही अधिक भासणार असून, किनारपट्टी क्षेत्रामध्ये दमटपणा अडचणी वाढवताना दिसणार आहे.