Maharashtra Weather News : वीकेंड (Weekend) जवळ आला अर्थात आठवड्याचा शेवट दिसू लागला की अनेकांचीच लगबग सुरू होते ती म्हणजे ही सुद्धी मार्गी लावण्याची. सुट्टीच्या दिवशी घरात बसून राहण्यापेक्षा एखाद्या जवळच्या ठिकाणी किंवा पूर्वनियोजित बेत आखत एखाद्या चांगल्याशा ठिकाणी काही निवांत क्षण व्यतीत करण्याला अनेकांचीच पसंती असते. तुम्हीही त्यातलेच आहात का? या वीकेंडला असा कोणता प्लॅन आखत असाल तर आधी हवामानाचा अंदाज पाहून घ्या. कारण, थंडी आहे म्हणून तुम्ही एखाद्या भागामध्ये जाण्यासाठी निघत असाल आणि तिथं चक्क पाऊसच हजेरी लावून तुमची तारांबळ उडवू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्याच्या मराठवाडा आणि विदर्भावर पावसाचं सावट असून, येथील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची हजेरी पाहायला मिळू शकते. तर, मध्य महाराष्ट्रात मात्र वातावारण ढगाळ राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोकण पट्ट्यामध्ये दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा जाणवणार आहे, तर सातारा, पुणे, कोल्हापूर भागाच्या पर्वतीय भागांमध्ये मात्र बोचरी थंडी जाणवणार आहे. 


सध्याच्या घडीला विदर्भाच्या पूर्वेकडून चक्राकार वारे वाहत आहेत. ज्यामुळं तेलंगणा आणि कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या दृष्टीनं पोषक वातावरण तयार झालं आहे. मराठवाड्याच्या परभणी, बीड, धाराशीव, लातूर या जिल्ह्यांमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. 


उत्तर भारतात कुठे वाढणार थंडीचा जोर? 


उत्तर भारतातील उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर यांसारख्या राज्यांमधील पर्वतीय क्षेत्रांमध्ये दिवसागणिक थंडीचा कडाका वाढू लागला आहे. तर, मैदानी क्षेत्रांमध्ये मात्र तापमानाच चढ - उतार नोंदवले जात आहेत. परिणामी दिल्ली आणि पंजाबसह राजस्थान आणि मध्य प्रदेशापर्यंत या हवामानाचे परिणाम दिसून येत आहेत. 


हेसुद्धा वाचा : गुगलच्या मदतीनं राज्याचा विकास करण्याचा फडणवीस यांचा प्लान; सरकारचा Google सोबत महत्वाचा करार


 


हवामान विभागाच्या माहितीनुसार काश्मीरच्या बहुतांश भागांमध्ये सुरु असणारी शीतलहर पुढील काही दिवसांसाठी कायम राहणार असून, इथंलं किमान तापमान उणे 10.8 अंशांहूनही कमी असणार आहे. सध्याच्या घडीला काश्मीरमध्ये सर्वत्र बर्फाची शुभ्र चादर पाहायला मिळत असल्यामुळं इथल्या स्थानिकांसोबतच काश्मीर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे.