Maharashtra weather updates : वर्षअखेरीस देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय क्षेत्रात तापमानात घट झाली खरी. पण, महाराष्ट्रातील तापमानावर मात्र याचे थेट परिणाम दिसून आले नाहीत. मागच्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधीच किमान तापमानात वाढ झाल्यामुळं थंडी काही अंशी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नव्हे, तर सध्या मध्य महाराष्ट्रासह कोकण पट्ट्यामध्ये हवामानात बदल होत असून, पावसासाठी पूरक परिस्थिती तयार होत असल्यामुळं या भागांमध्ये पावसाची हजेरी नाकारता येत नसल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


हेसुद्धा वाचा : New Year 2024 : घरबसल्या पाहा महाकाल, सिद्धीविनायक आणि गंगा आरती; करा नव्या वर्षाची मंगलमयी सुरुवात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या आग्नेयेकडे सध्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं वाऱ्यांची दिशा सध्या वायव्येकडे जाताना दिसत असून, ती दिवसागणिक आणखी तीव्र होत आहे. त्यामुळं येत्या काही तासांमध्ये या वाऱ्यांचं रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होऊन कोकण पट्ट्यामध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


दरम्यान, पावसाची शक्यता असल्यामुळं राज्यात सध्या थंडीचं प्रमाण कमीच राहील असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या काळात राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांचं तापमान अंशांच्या वरच राहून बुधवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर भारत मात्र यासाठी अपवाद असेल. 


उत्तर भारतात वाढणार थंडीचा कडाका 


आयएमडीच्या अंदाजानुसार उत्तर भारताच्या मैदानी क्षेत्रांमध्ये धुक्याचं प्रमाण वाढून दृश्यमानतेवर आणि थेट वाहतुकीच्या मार्गांवर याचे परिणाम दिसून येणार आहेत. पुढच्या दोन दिवसांमध्ये देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये थंडी वाढणार आहे. तर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानातही थंडी वाढताना दिसणार आहे. 


जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्किम, बिहार, झारखंड, ओडिशा, असम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या भागांना कडाक्याच्या थंडीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काश्मीरमध्ये थंडीचं प्रमाण येत्या काही दिवसांत आणखी वाढणार असून, जोरदार बर्फवृष्टीचे संकेतही देण्यात आले आहेत.