आठवड्याच्या शेवटी खुशाल करा हिवाळी सहलीचा प्लॅन; कोणत्या भागांमध्ये वाढणार थंडीचा कडाका?
Maharashtra Weather News : आठवडी सुट्टी आणि थंडीसाठी राज्यात पूरक वातावरण पाहता ही सुट्टी सार्थकी लावण्याच्या विचारात असाल तर हीच उत्तम वेळ...
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील (Maharashtra Vidhansabha Election Result 2024) विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच प्रत्यक्षात मात्र राज्यातील हवामानात हिवाळा हा ऋतू चांगलाच तग धरताना दिसत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांपासून अगदी कोकण आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला आहे.
पुढील 48 तासांमध्ये हेच चित्र कायम राहणार असून, उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या शीतलरहींचे थेट परिणाम राज्यावर दिसणार आहेत. सध्या देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागांमध्ये तापमानात लक्षणीय घत झाली आहे. सीमेपलिकडून हिमालय पर्वतरांगेच्या क्षेत्रावरून देशाच्या सीमा ओलांडून येणाऱ्या या शीतलहरींचा वेग वाढल्यामुळं देशातील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रात नाशिकमध्ये बोचऱ्या थंडीला सुरुवात झाली असून, निफाडमध्ये पारा 10.5 अंशावर पोहोचला आहे. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही तापमानाचा आकडा 13 अंशांहून कमी झाल्याचं लक्षात येत आहे. इथं कोकण किनारपट्टी क्षेत्रापासून, पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापुरातही तापमानाच घट झाल्यामुळं अनेक पर्यटकांचे पायही महाबळेश्वर, गगनबावडा, पाचगणी, लोणावळा, अलिबाग या आणि अशा अनेक ठिकाणांकडे वळत आहेत. थोडक्यात हिवाळी सहलींचे बेत आखण्यात सुरुवात करण्यासाठीचा उत्तम काळ आता सुरू झाला आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.
हेसुद्धा वाचा : Mumbai Vidhan Sabha Election Results LIVE: मुंबईत आवाज कुणाचा? पाहा सर्वात वेगवान निकाल एका क्लिकवर
पावसाची शक्यता नाकारता येत नाही....
अरबी समुद्राच्या आग्नेयेकडून केरळातील दक्षिण क्षेत्राकडे चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होताना दिसत आहे. अंदमानच्या दक्षिणेकडील सागरी क्षेत्रामध्येसुद्धा चक्रीय वाऱ्यांची निर्मिती होत असल्यामुळं राज्यासह देशातील काही किनारपट्टी क्षेत्रांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, यवतमाळ इथंही वातावरण काहीसं ढगाळ असेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अंदमानच्या समुद्रात तयार होणारं हे कमी दाबाचं क्षेत्र वायव्य आणि उत्तरेच्या दिशेनं पुढे सरकणार असून, पुढील 48 तासांमध्ये काही अंशी हवामान बदलांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.