Maharashtra Weather : राज्यात अवकाळीसह गारपीटीचं थैमान सुरुच; देशातही हीच परिस्थिती
Maharashtra Weather News : राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस अद्यापही पूर्णपणे माघारी परतलेला नाही. त्यातच देशातील बहुतांश राज्यांमध्येही हवामानाची हीच परिस्थिती. पाहा काय आहेच हवामानाचा आजचा अंदाज
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सुरु असणारं अवकाळीचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नसतानाच हवामान खात्यानं चिंतेत आणखी भर टाकणारी माहिती दिली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवारपासून पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीची हजेरी असेल तर, काही भागांमध्ये गारपीटीचाही तडाखा बसणार आहे. याच अंदाजाप्रमाणं राज्यातील बऱ्याच भागांना अवकाळीनं झोडपलं. (Maharashtra weather news unseasonal rain continues 7 states will drizzling amid summer days)
नाशिकमधील निफाड तालुक्यात मंगळवारी जोरदार अवकाळी पाऊस झाला. ज्यामुळं गोदाकाठावर चांदोरी, सायखेडा, शिंगेवे, करंजगाव, चापडगाव, म्हळसाकोरे ही गावं प्रभावित झाली. या अवकाळी पावसामुळं द्राक्ष, कांदा, गाजर या पिकाचं अतोनात नुकसान झालं. तिथं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकरमध्ये गारांचा पाऊस पडला. मंदिर परिसरापासून डोंगरमाथ्यापर्यंत झालेल्या गारपीटीमुळं आणि पावसामुळं इथं गार वारे वाहण्यास सुरुवात झाली.
भारतातील हवामानाची काय परिस्थिती?
इथं महाराष्ट्रातील काही भागांतून अवकाळी काढता पाय घेण्याचं नाव घेत नसतानाच देशातील हवामानतही अशीच स्थिती तयार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या पश्चिमी झंझावात सक्रिय नसला तरीही, अरबी समुद्र आणि त्यालगतच असणाऱ्या दक्षिण पाकिस्तान प्रांतावर कमी दाबाचा पट्टा तयार होताना दिसत आहे. ज्यामुळं काही भागांमध्ये पर्जन्यमानाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
हेसुद्धा वाचा : Monsoon Alert : दिलासा! पाहा मान्सूनसंदर्भातील सर्वात पहिली आणि मोठी बातमी
IMD च्या अंदाजानुसार अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, तामिळनाडूचा काही भाग, हिमाचल प्रदेशचा काही भाग, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश या भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसाची हजेरी आजच्या दिवसात पाहायला मिळू शकते.
स्कायमेटच्या (Skymet) वृत्तानुसार पुढील 24 तासांत हिमालयाचा पश्चिम भाग, तामिळनाडू, कर्नाटकचा किनारपट्टी भाग आणि लक्षद्वीप येथे पावसाच्या हलक्या सरी बरसतील. राजस्थानात धुळीचं वादळ येण्याची शक्यता असून, काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल.
चारधाम यात्रेवर परिणाम...
चारधाम यात्रा सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच सध्या उत्तराखंडमध्ये यंत्रणा बदलणाऱ्या हवामानावरही नजर ठेवून आहेत. सध्या उत्तराखंडमध्ये पाऊस आणि हिमवृष्टी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार इथं 14 एप्रिलनंतर तापमानाच काही अंशी वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, चारधाम यात्रा काळात यात्रेकरूना काही टप्प्यांवर पाऊस आणि बर्फवष्टीचा सामना करावा लागू शकतो.
थोडक्यात पर्यटनासाठी तुम्ही देशाच्या उत्तरेकडे मार्गस्थ होणार असाल तर तिथल्या हवामानाचा अंदाज विचारात घेत त्या अनुशंगानं तयारी करा. अन्यथा हवामान बदलांचे थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात.