थंडी RETURNS; कोणत्या भागात वाढणार गारठा? काश्मीरपासून विदर्भापर्यंतचा अंदाज एका क्लिकवर
Maharashtra Weather News : राज्यातील कमी झालेल्या थंडीनं आता पुन्हा जोर धरण्यास सुरुवात केली असून, त्याचा परिणाम नेमका कोणत्या भागांवर दिसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Maharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून राज्यापासून काहीशी दुरावलेली थंडी आता पुन्हा एकदा परतताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 24 ते 48 तासांमध्ये राज्यातील तापमानात सरासरी 3 ते 4 अंशांची घट अपेक्षित असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. या प्रणालीचा सर्वाधिक परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात होताना दिसणार असून, मध्य महाराष्ट्रातील काही भागांवरही थंडीचा प्रभाव पाहायला मिळणार आहे.
राज्यात थंडी पुन्हा जोर धरणार असून, वरील भागांमध्ये किमान तापमानाचा आकडा पुन्हा एकदा 10 अंशांहून कमी असल्याचं पाहिलं जाईल. कोकण पट्ट्यामध्ये तापमानात फारशी घट अपेक्षित नसून, उलटपक्षी इथं सूर्य डोक्यावर येत असताना तापमानात काहीशी वाढ झाल्याचं जाणवेल. इथं मुंबई आणि उपनगरांमध्ये सायंकाळी तापमानात घट अपेक्षित असून, दिवसा मात्र उष्मा अडचणी वाढवताना दिसेल.
हेसुद्धा वाचा : मुंबई गोवा महामार्गाबाबत सर्वात मोठी अपटेड; कोकणात जाताना कशेडी घाट लागणार नाही; 45 मिनिटांचा प्रवास फक्त 8 मिनीटांत
दरम्यान मागील 24 तासांचा आढावा घेतल्यास नागपूरमध्ये नीच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. इथं तापमानाचा आकडा 8.8 अंश इतका होता. तर, धुळे, भंडारा आणि गोंदियामध्येगही 10 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. येत्या काही दिवसांमध्ये हे तापमानही कमी होणार असून, पुन्हा बोचरी थंडी राज्य व्यापेल हेच स्पष्ट होत आहे.
IMD नं दिला देशातील हवामानाचा आढावा
IMD नं वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका आणखी वाढणार असून, तापमानात लक्षणीय घट नोंदवली जाणार आहे. सध्या सक्रिय पश्चिमी झंझावातामुळं पर्वतीय क्षेत्रावर होणाऱ्या हिमवृष्टीचा थेट परिणाम मैदानी क्षेत्रांवर होताना दिसत आहे. उत्तर भारतातील अनेक मैदानी भागांमध्ये धुक्याच्या चादरीनं अडचणी वाढवल्या आहेत. तर, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी गारठा वाढवण्यास कारणीभूत ठरत आहेत.
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरच्या पर्वतीय भागांवर होणारी अतीव हिमवृष्टी पाहता इथं अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. स्थानिकांसह या भागांमध्ये येणाऱ्या पर्यटकांनीही या दिवसा सतर्कता बाळगावी असं आवाहन सध्या यंत्रणा करताना दिसत आहेत.