Maharashtra Weather : हुडहूडी! वीकेंडला थंडी वाढणार, ढगाळ वातावरण मात्र पाठ नाही सोडणार
Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून सुरु असणारं अवकाळीचं वातावरण आता तुलनेनं कमी होणार असून, थंडीचा कडाका वाढताना दिसणार आहे.
Maharashtra Weather : सातारा (Satara), पुण्यापासून (Pune) जळगावपर्यंत राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमधील किमान तापमानाचा आकडा मोठ्या फरकानं कमी झाल्याचं समोर आलं असून, आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात थंडीची सुरुवात झाली असं म्हचलं जात आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसांसाठी हे चित्र कायम राहणार असून, आठवड्याचा शेवट आणि नव्या आठवड्याची सुरुवात कडाक्याच्या थंडीनं होणार आहे.
हवामान विभागाच्या माहिनीनुसार नंदुरबार, अमरावती, जळगाव, भंडारा, नाशिक, पुणे, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हयांमध्ये किमान तापमान आणखी कमी होऊन थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यत आहे. उत्तर भारतामध्ये पश्चिमि झंझावातामुळं हिमालयीन क्षेत्रामध्ये बर्फवृष्टी आणि गारठा वाढवणारा पाऊसही बसरत असल्यामुळं त्या हवामानाचे परिणाम महाराष्ट्रापर्यंत दिसून येत आहेत.
हेसुद्धा वाचा : एकदोन नव्हे, मुंबईत तब्बल 13 दिवस पाणीकपात; तारखा आताच पाहून घ्या
मुंबई ठरणार अपवाद... (Mumbai Weather)
राज्यात थंडीचा कडाका वाढत असला तरीही मुंबई शहरात मात्र पहाटेचे काही तास वगळता थंडीचा लवलेषही पाहायला मिळणार नाही. इथं किमान तापमानात फारशी घट होणार नसल्यामुळं शहरातील नागरिकांना दमट हवामानालाच सामोरं जावं लागणार आहे. नव्या आठवड्याच्या सुरुवातीला शहरात काहीसा गारवा जाणवू शकतो. पण, कमाल तापमान 36 अंशांदरम्यान राहणार असल्यामुळं हा दाह कमी होण्याचं चित्र तूर्तास दिसत नाही.
राज्याच्या कोकण पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण कायम असणार आहे. पण, पहाटेच्या वेळी मात्र इथंही वातावरणात गारवा जाणवेल. खासगी हवामान संस्था 'स्कायमेट'च्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये बांगलादेशच्या दक्षिण किनाऱ्यापासून दक्षिण पूर्व बंगालपर्यंत बहुतांश भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, तिथं तामिळनाडू आणि केरळच्या किनारपट्टी भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागांमध्येही पावसाच्या तुरळक सरींची शक्यता असून, देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्येही पावसाचा शिडकावा होऊ शकतो.
काश्मीरच्या खोऱ्यात मात्र थंडीचा कडाका वाढणार आहे. यामुळं जनजीवनही विस्कळीत होऊ शकतं. हिमाचल प्रदेशातील डोंगराळ क्षेत्रांवरही शुभ्र बर्फाची चादर पाहायला मिळू शकते. थोडक्यात देशभरात तुलनेनं पावसापेक्षा सध्या थंडीचं पारडं जड दिसत आहे.