Weather News : पहाटेची थंडी, दुपारचा उकाडा; दिवसभरात नेमकं किती वेळा बदलतंय हवामान?
Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार देशासह राज्यातील हवामानामध्ये होणारे हे बदल नेमके कधी थांबणार? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त....
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आता उन्हाळा जाणवू लागला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातून अवकाळी पावसाचं सावट माघारी फिरलं असलं तरीही त्यानंतर दिसणारे बदल मात्र नागरिकांना हैराण करून सोडत आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही असंच काहीसं चित्र. सध्या कोकण किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये पहाटेच्या वेळी पडणारी थंडीसुद्धा आता कमी झाली असून, दुपारच्या वेळी तापमानात बहुतांशी वाढ झाल्याचं लक्षात येत आहे. पुढील 48 तासांसाठी हवामानाचं हे चित्र कायम राहणार आहे.
किनारपट्टी भागांमधील हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्यामुळं इथं उन्हाचा दाह अपेक्षेहून जास्त जाणवणार आहे. दरम्यान, उर्वरित राज्यामध्ये तापमानात चढ- उतार सातत्यानं दिसणार असल्यामुळं या हवामान बदलांनी तुम्हीही हैराण होणार आहात. राज्याच्या निफाड, धुळे यांसारख्या काही भागांमध्ये मात्र अचानकच तापमानात घटही नोंदवली जाऊ शकते.
सध्या मध्य प्रदेशपासून तेलंगणा, विदर्भ, कर्नाटक आणि तामिळनाडूपर्यंत सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आता निवळला असल्यामुळं शेजारी राज्यांमध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
देशाच्या उत्तरेकडे थंडीचं दणक्यात पुनरागमन
देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये पुन्हा एकदा शीतलहरी सक्रिय झाल्या असून, तिथं आता जोरदार हिमवृष्टी सुरु झाली आहे. परिणाम मैदानी क्षेत्रांसहर दिल्ली, हरियाणा, पंजाबपर्यंत पुन्हा एकदा थंडीची लाट पाहायला मिळत आहे. पश्चिमी झंझावात आणि या शीतलहरींमुळं शनिवारपर्यंत वातावरणात हा गारवा कायम राहणार आहे. तिथं अरुणाचल प्रदेशात पावसाच्या हजेरीसह हिमवृष्टीचाही अंदाज आहे. तर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, ओडिशा यांसारख्या ठिकाणीसुग्धा पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेसुद्धा वाचा : Mumbai News : मुंबई शहर ते उपनगर.... काय आहेत घरांच्या किमती? एका क्लिकवर जाणून घ्या कोणत्या भागांना सर्वाधिक मागणी
6 मार्चपासून पश्चिमी हिमालय क्षेत्रांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीसंदर्भातील हवामान प्रणालीला वेग येणार असून, 7 मार्चपपर्यंत ही स्थिती कायम राहण्याचे संकेत हवामान विभागानं दिले आहेत. दरम्यान, सध्या देशातील पंजाब आणि लगतच्या भागांमध्ये चक्रीवादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होत असून, त्याचाच एक पट्टा छत्तीसगढच्या दिशेनंही सक्रिय होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तेव्हा आता हे वारे देशातील हवामानावर नेमका कसा परिणाम करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.