Cyclone Biporjoy Live Updates: देशाच्या किनारपट्टी भागांवर सध्या एक वादळ घोंगावत असून, महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टी भागांपासून हे वादळ फारक दूर नाही. बुधवारी या चक्रिवादळानं पुन्हा एकदा रौद्र रुप धारण केलं आणि गुरुवारीसुद्धा त्याचं असंच काहीसं रुप पाहायला मिळत आहे. बिपरजॉय असं नाव असणाऱ्या या चक्रिवादळाचं हे रौद्र रुप 9 जूनपर्यंत पाहायला मिळणार आहे. त्यामुळं गोवा- कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर उंचच उंच लाटा उसळण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथे मुंबईच्या समुद्रात वादळाचे थेट परिणाम दिसून येणार नसले तरीही मच्छिमारांनी लहान नौकांसह खोल समुद्रात टाळावं असाही इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला या वादळाचे थेट परिणाम मान्सूनवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी मान्सूननं अद्याप केरळातही प्रवेश केलेला नाही. ज्यामुळं त्याच्या महाराष्ट्रातील आगमन दिवसाची प्रतीक्षाही आता वाढली आहे. (Maharashtra weather updates Cyclone Biporjoy Location monsoon predictions news )


हेसुद्धा वाचा : Monsoon Updates : पाऊस आलाsss; पुढच्या 48 तासांत मान्सून केरळात


हवामान विभागाच्या माहितीनुसार अरबी समुद्रातील हे वादळ सध्या 5 किमी प्रतीतास इतक्या वेगानं उत्तरेकडे सरकत आहे. पुढील 24 तासांत वादळाचा प्रवास उत्तरेच्या दिशेनं सुरु राहील आणि त्यानंतरच्या तीन ते चार दिवसांमध्ये ते उत्तर वायव्येला जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


महाराष्ट्रात उन्हाळा काही कमी होईना... 


इथे राज्याच्या किनारपट्टी भागावरून घोंगावणारं वादळ पुढे सरकत असतानाच तिथे विदर्भात मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी तापमान 43 अंशांच्याही पलीकडे गेलं आहे. त्यामुळे राज्यातून उकाडा काही कमी होताना दिसत नाहीये. मुंबई आणि पालघर भागांमध्ये समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे या भागांमध्ये आर्द्रतेचं प्रमाणही जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे. 



राज्यात उकाडा अधिक भासत असतानाच मराठवाडा आणि कोकणाच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहता येणार आहे. त्यामुळे या बदलत्या हवामानाच्या धर्तीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. थोडक्यात आता संपूर्ण देशाच्या बहुतांश भागांमध्ये वाढणारा हा उन्हाचा दाह पाहता सर्वांनाच मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे. आता हा मान्सून नेमका कधी येतो हे पाहणं महत्त्वाचं.