Weather Updates : राज्याच्या `या` भागात तापमान चाळीशीपार; `या` भागांवर पावसाचं सावट
Maharashtra weather updates : राज्यातून थंडीनं काढता पाय घेतला असून, आता बहुतांश भागांमध्ये उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
Maharashtra weather updates : कमी दाबाचा पट्टा आणि पश्चिमी झंझावात अशा स्थितीमुळं राज्यातून सध्या थंडीनं काढता पाय घेतला आहे. परिणामी राज्याच्या विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळीनं झोडपलं आहे. अवकाळीच्या माऱ्यामुळं इथं शेतपिकांचंही मोठं नुकसान झालं असून, शेतकऱ्यापुढं अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येसुद्धा मराठवाडा आणि विदर्भावर पावसाचं सावट कायम राहणार असून, काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये असणारी थंडी वगळता उर्वरित राज्यामध्ये मात्र आता लख्ख सूर्यप्रकाश पडू लागला असून, दुपारच्या वेळी तापमान उच्चांक गाठताना दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातूनही आता थंडीनं दडी मारली असून, इथं हवेत दमटपणा जाणवू लागल्यानं उष्णतेचा दाह अधिक जाणवू लागला आहे. ठाणे आणि मुंबईतही तापमानाचा आकडा वाढत असून, ठाण्यामध्ये दिवसाचं तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचू लागला आहे. थोडक्यात फेब्रुवारी संपण्यापूर्वीच राज्यात नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
हेसुद्धा वाचा : भाजपने ब्लॅकमेलिंग केलं; अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर प्रणिती शिंदे यांचा अत्यंत गंभीर आरोप
राज्यात येत्या काही दिवसांमध्ये उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार असून, अनेक भागांमध्ये उकाडा जाणवू लागणार आहे. पण, अवकाळीच्या हजेरीमुळं मात्र काही जिल्हे यास अपवाद ठरणार आहेत. त्यामुळं हवामान पुन्हा चिंता वाढवणार हे निश्चित.
काश्मीरमध्ये शीतलहरीचा जोर
तिथं राजस्थान आणि मध्य प्रदेशास दक्षिणेकडे असणाऱ्या कर्नाटक आणि तामिळनाडूवर पावसाचं सावट असतानाच, देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र थंडी कायम आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, काश्मीर या भागांच्या मैदानी क्षेत्रांमध्ये तापमानात चढ उतार होण्याचा अंदाज आहे. तर काश्मीरच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये मात्र शीतलहर कायम राहणार आहे. हवामान विभागाच्या वतीनं जम्मू काश्मीरमध्ये हिमवृष्टी सुरु राहणार आहे. तर किमान तापमान उणे 3.6 ते उणे 19 अंश सेल्सिअसदरम्यान असेल. येत्या काही दिवसांमध्ये काश्मीरमधील थंडीचं प्रमाण काही अंशी वाढून त्यानंतर इथंही तापमानाच चढ उतार पाहायला मिळू शकतात.अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्वण्यात आली आहे.