Weather Update : मान्सूननं काढता पाय घेतल्यानंतर राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला आणि ऑक्टोबर हीटनं अनेकानाच हैराण केलं. नोव्हेंबर महिन्यात मात्र हे चित्र काहीसं बदलताना दिसत आहे. अर्थाच मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसर मात्र याला अपवाद ठरत आहे. कारण, या भागांमध्ये अद्यापही दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा जीवाची काहिली करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांपासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सर्वत्रच थंडीची चाहूल लागली आहे. दोन दिवसांपूर्वी जळगावमध्ये देशाच्या मैदानी भागांमधील सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली, इथं पारा 10 अंशांवर पोहोचला होता. येत्या काही दिवसांमध्येही राज्याच हवामानाचं असंच चित्र पाहायला मिळणार असून हा विकेंड गुलाबी थंडीच गाजवताना दिसणार आहे. पुण्यातही रात्रीपासून पहाटेपर्यंत थंडीचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. 


कुठे असणार पावसाची हजेरी? 


राज्यात हिवाळा तग धरू पाहत असतानाच कोकण पट्टा, कोल्हापूर आणि गोव्यापर्यंतच्या भागात मात्र पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. हवामान विभागाच्या माहितीनुसार सिंधुदुर्ग (Sindhudurg), कोल्हापूर आणि गोव्याच्या काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट होऊन पाऊस बरसू शकतो.


हेसुद्धा वाचा : Nepal Earthquake : नेपाळमधील विनाशकारी भूकंपाचे हादरे उत्तर भारतापर्यंत; मृतांचा आकडा मोठा 


अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं ही परिस्थिती उदभवल्याचं सांगण्यात येत आहे. देश पातळीवरही असंच काहीसं चित्र पाहायला मिळेल. जिथं तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटच्या किनारपट्टी भागामध्ये पावसाची हजेरी असेल. याशिवाय पुढील 24 तासांमध्ये अंदमान निकोबार बेट समूह, पुद्दुचेरी आणि लक्षद्वीपमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळेल. 


उत्तर भारतावर बर्फाची चादर.... 


इथं उर्वरित भारतामध्ये हवामानात मोठे बदल होत असतानाच हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या पर्वतीय भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मैदानी क्षेत्रांमध्ये याचा परिणाम होताना दिसणार असून, या भागांमध्ये तापमानात घट नोंदवली जाणार आहे. काश्मीरच्या गिलगिट, बाल्टिस्तानसह लडाखच्या दुर्गम गावांमध्येही बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. फक्त पर्वतीय भागच नव्हे तर, उत्तरेकडे असणाऱ्या पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या आणि लगतच्या भागांमध्येही गारठा जाणवेल.