आला रे आला... मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण मुंबईत अशी असेल हवामानाची स्थिती!
Mansoon in Mumbai: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
Maharashtra Weather Forec:उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. केरळनंतर (Kerla) आज मान्सून महाराष्ट्रात (Monsoon) दाखल झाला आहे. आज ११ जून रोजी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाने आज ही माहिती दिली आहे. (Monsoon Arrives In Maharashtra)
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसह राज्यातील शेतकरीही चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. मान्सूच्या आगमनाची वार्ता ऐकताच सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे. केरळात 8 जून रोजी मान्सून धडकला होता. केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती. मात्र, या सगळ्या शक्यतांवर मात करत मान्सून आज ११ जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनचे आज ११ जूनरोजी महाराष्ट्रात आगमन झाले आहे. दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटकचा व तामीळनाडू व आंधप्रदेशचा काही मान्सूनने व्यापला आहे.
दरम्यान, मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असला तरी मुंबईत पावसाच्या सरी कधी बरसणार याची माहिती अद्याप हवामान विभागाने दिलेली नाही. होसाळीकर यांनी ट्विट करत मुंबईतील हवामान कसं राहिल याची माहिती दिली आहे. शहर व उपनगरात गडगडाटाच्या शक्यतेसह अंशतः आकाश ढगाळ राहिल. तसंच, वादळी वारे ४०- ५० किमीपर्यंत प्रतितास वाहतील. शहर आणि उपनगरांमध्ये उष्ण ते दमट स्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असला तरी तो सक्रीय कधी होणार याबाबत लवकरच हवामान विभाग माहिती देणार आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होणार
दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळामुळं मान्सून अधिक लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. बिपरजॉय चक्रीवादळ येत्या २४ तासांत अधिक तीव्र होणार आहे. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीला जाणवू शकतो. मात्र, मुंबईला त्याचा फारसा धोका नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले असले तरी शनिवारी रात्री मुंबई शहर व उपनगर परिसरात सोसाट्याचा वारा सुटला होता. तसंच गिरगाव चौपाटीवर वाळूचे लोट उसळले असून समुद्राच्या लाटाही खवळल्या होत्या.
कोकण किनारपट्टीला धोका
बिपरजॉय चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे ७०० किमीवर आणि मुंबईच्या नैऋत्येला ६३० किमीवर पुढे सरकले आहे. येत्या २४ तासांत ते आणखी तीव्र होऊन ईशान्येकडे सरकरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजरात आणि कोकण किनारपट्टीला त्याचा परिमाम जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळातील तिरुवअनंतपूरम, कोल्लम, पाथनमथिट्टा, अलापुझ्झा, कोट्टायम, इडुक्की, कोझिकोडे आणि कण्णूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तिथं केरळात मान्सूनही सुरु झाल्यामुळं आता या राज्याला पावसाचा तडाखा बसण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत.