Worli Hit And Run : वरळीत हिट अँड रन प्रकरणाचं शिंदेंच्या शिवसेनेशी कनेक्शन; राजकारणात चर्चेला उधाण!
Worli Hit And Run Politics : वरळीत झालेल्या हिट अँड रन प्रकरणात शिवसेना शिंदे पक्षाचं कनेक्शन असल्याचं समोर आलं. त्यामुळे आता या हीट अँड रनमध्ये राजकारणही सुरु झालंय. मात्र खऱ्या आरोपीला गजाआड कधी करणार, त्याच्यावर कधी कारवाई करणार असा संतप्त सवाल सर्वसामान्यांनी केलाय.
Worli Hit And Run : मोठ्या बापाच्या पोराचा प्रताप पुन्हा मुंबईतही पहायला मिळालाय. पुण्यात ज्याप्रकारे 'हिट अँड रन'मध्ये दोघांना प्राण गमवावे लागले. त्याचप्रमाणे वरळीत हिट अँड रनमध्ये एका महिलेला जीव गमवावा लागलाय. वरळीतल्या हिट अँड रनचं शिंदेंच्या शिवसेनेचं कनेक्शन समोर आलंय. आरोपी मिहिर शाहाचे वडील शिवसेनेचे पालघरचे उपनेता आहेत. या BMW कारवरचा पक्षाचा स्टिकर हटवल्याचा आरोपही मृत महिलेच्या पतीने केलाय.
वेळीच ब्रेक मारला असता तर त्या महिलेचा जीव वाचला असता. चालकाने पळून जाण्याच्या नादात महिले फरफटत नेले. या प्रकरणात 302 चा गुन्हा लावला पाहिजे, अशी मागणी मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केलीय. वरळी हिट अँड रनप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलीय.
नेमकं काय झालं?
भरधाव BMW कारने वरळीत दुचाकीला उडवलं. रस्त्याच्या कडेने जात असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. तेव्हा दुचाकीवरचं नाखवा दाम्पत्य बोनेटवर आदळलं. ब्रेक मारल्यावर हे दाम्पत्य खाली पडलं. प्रदीप नाखवा कारच्या कडेला पडले. मात्र, कारखाली सापडलेल्या आपल्या पत्नीला बाहेर खेचणार तो मिहिर शाहाने गाडी पळवली. BMW कारसोबत महिलेला फरफटत नेलं. गंभीर जखमी झालेल्या महिलेला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टर्सनी कावेरी नाखवा यांना मृत घोषित केलं.
ज्या BMW कारने महिलेला चिरडलं ती गाडी शिवसेनेचे उपनेते राजेश शहांची आहे. त्यांचा 24 वर्षांचा मुलगा मुख्य आरोपी आहे. मात्र कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. दोषींना शिक्षा होणारच असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. मुंबई पोलिसांनी BMW कारचा चालक मुलगा तसंच त्याच्यासोबत असलेला ड्रायव्हर या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होऊन नाखवा दाम्पत्याला न्याय कधी मिळणार का? हाच महत्त्वाचा सवाल आहे.
दरम्यान, मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाह बारमधून बाहेर पडतानाचं सीसीटीव्ही फुटेज झी २४ तासच्या हाती आलं आहे. दुर्घटनेपूर्वी मिहिर शाह दारू प्याल्याचं समोर आलंय. रात्री जुहूमधील व्हाईस ग्लोबल तापस बारमध्ये आरोपी मिहिर शाह यानं आपल्या इतर मित्रांसोबत दारू पार्टी केली. त्याचं तब्बल 18 हजार 730 रुपयांचं बिल झालं होतं. त्या बिलाचे पैसे त्यानं व्हिजा कार्ड वापरुन ऑनलाईन भरले होते.