Maval lokSabha : मावळ लोकसभेतील महायुतीमधील बंड शमले, पण सुनील शेळकेंनी व्यक्त केली खंत, म्हणतात...
Maval lokSabha Election : शिंदे गटाचे श्रीरंग बारणे (Srirang Barane) यांचे एकजुटीने काम करणार महायुती मधील घटक पक्षांची भूमिका स्पष्ट आहे. मात्र, मावळ लोकसभेसाठी मावळ तालुक्यातील उमेदवार नसल्याची खंत कायम असल्याचं सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी म्हटलं आहे.
Sunil Shelke On Shrirang Barane : मावळ लोकसभा मतदारसंघ (Maval lokSabha) हा पहिल्यापासूनच चर्चेत राहिलेला मतदार संघ आहे. मावळ लोकसभेत पहिल्यापासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत झालेले तीनही खासदार हे शिवसेनेचेच होते त्यामुळे मावळला शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला मतदार संघ म्हणून ओळखला जातो, परंतु शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आता शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट झाल्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये यावेळी मतदारांचा कौल कोणत्या शिवसेनेला राहणार ही औसुक्याची गोष्ट आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये दोनही शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळेच आता मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हे महायुतीचे उमेदवार आहेत तर ठाकरे गटाचे संजोग वाघेरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावाला मावळ तालुक्यामधून तीव्र विरोध सुरू होता.
महायुती मधीलच घटक पक्ष भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीसाठी विरोध करण्यात आला होता. स्थानिक कार्यकर्ते देखील श्रीरंग बारणे यांच्या नावाला विरोध करू लागले होते. त्यामुळेच महायुती मधील मावळ लोकसभेची जागा कोणाला सोडली जाणार याची उत्सुकता सर्वच मतदारांना होती. मात्र अजित पवारांनी मावळ लोकसभेची जागा ही शिवसेनेलाच सोडणार अशी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मात्र महायुतीमधील घटकपक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी नरमाईची भूमिका घेतली. मात्र त्यानंतर भाजपमधून श्रीरंग बारणे यांच्या नावाला तीव्र विरोध करण्यात आला आणि मावळ लोकसभेची जागा ही भाजपलाच सोडण्यात यावी असा दावा करण्यात आला. परंतु आता शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
बारणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या घटक पक्षाकडून श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महायुतीचे घटक पक्षांमधील भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. बारणेंची उमेदवारी जाहीर होतात भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मावळ लोकसभेसाठी मावळ तालुक्यातील उमेदवार नसल्याची खंत कायम असल्याचं सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.
शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत मावळ लोकसभेमध्ये होत असली तरीदेखील समोरचा उमेदवार कोण आहे याची चिंता नसून कामाच्या जोरावर आणि असलेल्या जनसंपर्काच्या जोरावर मावळ लोकसभेमध्ये हॅट्रिक करणार असल्याचा विश्वास विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी मागील दहा वर्षात मावळ लोकसभेमध्ये न झालेल्या विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवत असल्याचे सांगितले आणि पहिल्यापासूनच हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला असल्याने श्रीरंग बारणे यांची हॅट्रिक रोखण्यात यशस्वी होणार असा दावा केला आहे.
दरम्यान, महायुती मधून श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर होताच महायुतीतील घटक पक्षातील भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी नरमाईची भूमिका घेतली. त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे हॅटट्रिक करणार की ठाकरे गटाचे संजोग वाघेरे हे बारणे यांची हॅट्रिक रोखणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.