Maharastra Politics : आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत आहेत. एकेकाळी खडसे मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही होते. भाजपमध्ये योग्य मान्सन्मान मिळत नसल्यानं त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी परत भाजप प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. खडसे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा केली होती. तरीही अद्याप खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. अशातच खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये बॅनर झळकले. या बॅनरवर शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत.


काय म्हणाले एकनाथ खडसे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मंत्री एकनाथ खडसे कोणत्या पक्षात आहेत? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ अखेर खडसेंनी दूर करत पुढचा राजकीय प्लॅन जाहीर केलाय. भाजपाकडून अद्याप प्रवेशाबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. मी आणखी काही दिवस भाजपाची वाट पाहील. अन्यथा मी पुन्हा शरद पवार गटात जाईल, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. मी अजूनही शरद पवार गटाचा सदस्य आहे. मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे दिला. मात्र, त्यांनी तो राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. शरद पवारांनी मला आमदारकीचा राजीनामा देण्यास विरोध केलेल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. 


एकनाथ खडसे यांनी पुन्हा शरद पवारांसोबत जाण्याचे संकेत दिलेत. भाजपकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही. अशी परिस्थितीत भाजपमध्ये राहणं आता योग्य नाही, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलंय. तावडे, नड्डांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला होता. मात्र काही जणांनी विरोध केला असावा, त्यामुळे प्रवेश जाहीर करण्यात आला नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय. खडसेंच्या विधानानंतर भाजपकडूनही प्रतिक्रिया उमटू लागल्यात. लोकसभेत खडसेंशिवाय काहीही अडलंय नाही, असं दिसलं असा टोला प्रवीण दरेकरांनी लगावलाय.


केंद्रीय नेत्यांनी एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिलाय. मात्र, राज्यातील आणि स्थानिक नेत्यांच्या एकनाथ खडसेंच्या घरवापसीला विरोध आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांच्या जळगाव दौऱ्यावर असताना खडसेंना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. भाजपचा प्रवेश रखडल्यानं खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचं जाहीर केलंय. म्हणजेच आता तेलही गेले, तूपही गेले अशी परिस्थिती खडसेंची झालीय.