Maharastra Rain Update : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं होतं. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं होतं. अशातच आता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Maharastra Rain Forecast) देखील वर्तविण्यात आलीये. तसेच उद्या म्हणजेच 29 मे रोजी कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मान्सूनची गुड न्यूज (Monsoon update)


पुढील 5 दिवसांत मान्सून केरळात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. देशात यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत हा पाऊस होणार आहे. भारताच्या मध्य आणि दक्षिण भागात मान्सून सामान्यपेक्षा जास्त राहील, असे आयएमडीने म्हटले आहे. भारताच्या ईशान्य भागात पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल. उत्तर-पश्चिम भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे.



मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका? (Mumbai Rain Update)


मुंबईसह उपनगरांत पुढील 4 दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तसंच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. काही दिवसांपासून हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे मुंबईकर हैराण झालेत. आता तापमानात घट झाली असली तरी उकाड्यामुळे अंगाची लाही होतेय. काल देखील मुंबईसह उपनगरांत ढगाळ वातावरण होते. काही भागात पहाटे पावसाचा शिडकावा देखील झाला. तसंच संध्याकाळी वातावरणात गारवा जाणवत होता.


उत्तर भारतात हाय गर्मी (Weather Update)


दरम्यान, पश्चिम राजस्थानच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पंजाबचे अनेक भाग, हरियाणा-चंडीगढ-दिल्ली, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेशचे काही भाग, मध्य प्रदेश, विदर्भातील वेगळ्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.