Unseasonal Rain : मुंबईत पुढील 24 तासात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, `या` जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather Forecast : राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीटीसह पाऊस (Unseasonal Rain In Maharastra) पडण्याची शक्यता आहे.
Unseasonal Rain In Maharastra : पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज हवामान खात्याने (Maharashtra Weather Forecast) वर्तविले आहेत. अशंतः ढगाळ आकाश असून संध्याकाळी रात्री हलका ते मेघगर्जनेसह पावसाची पडण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सियस आणि 28 अंश सेल्सियसच्या आसपास असेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती देखील हवामान खात्याने दिली आहे. तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज सायंकाळच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, हिंगोली तालुक्यातील ग्रामीण भागात या पावसाने हजेरी लावलीय. कळमनुरी शहरात रस्त्यावर वादळी वाऱ्याने झाड उनमळून पडलेत. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला असला तरी, या पावसामुळे शेतातील भाजीपाला व फळबागायतीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जातेय, त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाने हजेरी लावली,दुपारनंतर मिरज तालुक्यातल्या सलगरे या ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जवळपास दोन एकरावरील केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे. सोमनाथ अनंतपुरे यांची हातात तोंडाला आलेली केळीची बाग वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे,जवळपास 250 ते 300 केळीची झाडे वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडली आहेत.त्यामुळे अनंतपुरे यांचे सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाली असून शासनाकडून पंचनामा होऊन आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आनंतपुरे यांनी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसासह विजा कोसळल्याने जनावरांचा मृत्यू झाला आहे. मारेगाव तालुक्यातील धानोरा येथील शिवारात चिंचेच्या झाडाखाली उभे असलेले चार बोकड वीज पडून जागीच ठार झाले, त्यामुळे पशुपालकाचे मोठे नुकसान झाले तर झरीजामनी तालुक्यातील मार्कि बुद्रुक येथे दिवाकर ढेंगळे यांच्या शेतात वीज कोसळून तेथील दोन बैल ठार झाले.
हवामान विभागाने आज वाशिम जिल्ह्याला पाऊस पडण्याचा अंदाज दिला होता.त्यानुसार जिल्ह्यात मानोरा, वाशिम व मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला.पडतं असलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या भुईमूग,तीळ,ज्वारी मूग पिकांस फटका बसणार असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली.तर पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने गर्मीने हैराण असलेल्या वाशिमकराना दिलासा मिळाला. वादळी-वाऱ्यामुळे अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. तुफान वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. नांदेड, अर्धापूर, हदगाव तालुक्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला. नांदेड शहर आणि परिसरात पावसाचा जोर अधीक होता. तासभरापेक्षा जास्त वेळ अवकाळी पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे नांदेड शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते. अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. तुफान वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील झाडे उन्मळून पडली. रस्त्यावर गुडघाभरापेक्षा जास्त पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडली होती. या अवकाळी पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळित झाले होते. यंदा पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस बरसला. वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान झाले. प्रामुख्याने अंब्याचे मोठे नुकसान झाले. वाऱ्यामुळे आंबे गळून पडल्याने शेतक-यांना फटका बसला.