गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम :  हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेनं विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना दिलेली उमेदवारी पुन्हा मागे घेतली आहे. हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. भाजपनं हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने त्यांचा पत्ता कट झालाय. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास उरलेले असतानाही खासदार भावना गवळी यांना उमेदवारी मिळालेली नाही. उमेदवारीसाठी भावना गवळी मुंबईत तळ ठोकून आहेत मात्र कोणताही निर्णय झालेला नाही. दुसरीकडे हेमंत पाटील यांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला गवळींच्या जागेवरुन उभं करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भावना गवळी याची उमेदवारी कट केला असून हिंगोली जिल्ह्यातील हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भावना गवळी यांचे वाशिम येथील कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज झाले आहेत. कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन वाशिमच्या जनसंपर्क कार्यालया समोर भावना गवळींच्या समर्थनात घोषणाबाजी करत पार्सल उमेदवार नही चलेगा नही चलेगा अशा घोषणा देत नाराजी व्यक्त केली.


दुसरीकजे रात्री उशिरा हेमंत पाटील हे वाशिम येथे भाजपाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या घरी आले होते. यावेळी वाशिम- यवतमाळमध्ये शिवसेनेकडून राजश्री पाटील यांच्या उमेदवारीला होत आलेल्या विरोधाबाबत विचारले असतां त्यांनी बोलणं टाळलं. पक्ष जो आदेश देईल तो पाळण्यात येईल, मात्र हिंगोलीमधून मी निवडणूक लढविण्यास उत्सुक होतो. भावना गवळींसाठीही शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्र्याकडे आग्रही आहे, असे हेमंत पाटील म्हणाले.


सासू आणि जावयावर घरी बसण्याची वेळ आली आहे - हेमंत पाटील


"इथली उमेदवारी भावना गवळी यांनाच मिळाली पाहिजे. यासाठी मीसुद्धा मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरलेला आहे. शेवटी पक्षाचा आदेश हा अंतिम आदेश असतो. त्यामुळे पक्षाचा जो काही आदेश असेल तो आम्ही पाळू. माझी मुख्यमंत्र्यांना शेवटपर्यंत हीच विनंती होती की मी हिंगोलीतून उमेदवार असलो पाहिजे आणि वाशिममधून भावना गवळी. माझी स्वतःची सुद्धा उमेदवारी कापली गेलेली आहे. माझाही 38 वर्षांचा संघर्ष आहे. शेवटी सासू आणि जावयावर घरी बसण्याची वेळ आली आहे," अशी प्रतिक्रिया हेमंत पाटील यांनी दिली.


पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळणार का या प्रश्नावरही हेमंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "राजेंद्र पाटील हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. रात्रीपर्यंत हिंगोलीचे शिवसैनिक आपली उमेदवारी कायम राहिली पाहिजे ही मागणी घेऊन होते. मी पक्षाचा कार्यकर्ता असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने सांगतील त्यापद्धतीने काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत," असे हेमंत पाटील म्हणाले.