Maharstra Politics : विश्वजीत कदम यांचा नेमका रोख कुणावर? सांगलीच्या आखाड्याचा `वस्ताद` कोण?
Vishwajeet Kadam on Sangli : सांगली लोकसभा निवडणुकीत खडे टाकण्याचे काम केलं, त्यांना लोकांनी खड्यासारखं बाजूला केलं, असं विश्वजित कदमांनी म्हटलंय. त्यामुळे विश्वजीत कदम यांचा नेमका रोख कुणावर आहे? याचीच चर्चा सुरू आहे.
Vishwajit Kadam Statement : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरेंमधला संघर्ष दिसला तो सांगलीत... विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून विश्वजीत कदम (Vishwajit Kadam) यांनी जंग जंग पछाडलं. मात्र त्यांना मविआचं अधिकृत तिकीट मिळालं नाही. काँग्रेसमधून बंडखोरी करत विशाल पाटील (Vishal Patil) जिंकून आले. मात्र, विशाल पाटील यांच्याविरुद्ध राजकारण देखील याच काळात तापलं होतं. तेव्हा आता विशाल पाटील यांची उमेदवारी कापण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना विश्वजीत कदमांनी थेट इशाराच दिलाय.
काय म्हणाले विश्वजीत कदम?
सांगलीतील काँग्रेसनं एकत्र करत आम्ही सर्वांची मूठ बांधली होती. सगळी कटुता बाजूला ठेवत सांगलीच्या विकासासाठी एकत्र काम करण्याची सर्व काँग्रेस नेत्यांनी तयारी दर्शवली होती. पण आम्ही बांधलेली मूठ काहीजणांनी बघवली नाही. ज्यांनी-ज्यांनी खडे टाकण्याचे प्रयत्न केले. त्यांना त्यांची जागा या लोकसभेत दाखवून दिली आहे. आता ते आपल्यात खडे टाकण्याचं काम करणार नाही. पण आपली आणि कार्यकर्त्यांची एकजूट कायम राहायला हवी, असंही विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलंय.
विश्वजीत कदम यांनी आपला रोख नेमका कोणावर आहे हे स्पष्ट केलेलं नाही. मात्र त्यांचा रोख राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर असल्याची चर्चा सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सुरु आहे. एकीकडे सांगलीत 3 जागा जिंकू असा दावा करत कामाला लागण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात. तर तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातल्या 5 जागांवर काँग्रेस निवडणूक लढेल असं विश्वजीत कदम यांनी जाहीर केलंय.
दरम्यान, सांगलीत मविआच्या जागावाटपावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे बंडखोर विशाल पाटील यांचा भव्य सत्कार आयोजीत करण्याचा निर्धारही विश्वजीत कदम यांनी बोलून दाखवलाय. त्यावेळी सर्वांचा समाचार घेणार असल्याचा इशाराही विश्वजीत कदम यांनी दिलाय. त्यामुळे सांगलीतला मविआतला वाद वाढण्याची शक्यता आहे.