मिलिंद आंडे, झी मीडिया, वर्धा : जुन्या वास्तूला जपणे फार गरजेचं असतं. त्यात जर ते ऐतिहासिक वास्तू असेल तर त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम येथील बापू कुटीला सुद्धा वाचवण्यासाठी विविध प्रकारचा प्रयोग करावा लागतो. पावसाच्या आगमनापूर्वीच त्याच्या संरक्षणासाठी प्रयत्न सुरु आहे. बापू कुटीच्या भिंतींना काही धोका निर्माण होऊ नये म्हणून शिंदोळ्याच्या झाडांच्या पानोऱ्याची कुंपण करण्यात आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐतिहासिक बापूकुटीचं जतन - 


वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमातील कुटींच्या भिंती मातीच्या असल्याने त्याचं जतन करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळा सुरु होण्यापूर्वीच परिसर सिंदीच्या झाडांच्या पानांचा वापर केला जातो. पानांच्या झाडपीच (झांज्याच) आच्छादित करुन भिंतींचं संरक्षण केलं जातं. यामध्ये पाच हजार सिंदीच्या पानांचा वापर करत झांज्या तयार केल्या जातात. एकदा झांज्या तयार केल्या तर ते 3 वर्षांपर्यंत पावसाळ्यात उपयोगी ठरतात. 3 वर्ष उलटल्यावर पुन्हा नव्याने तयार करावे लागतात. 



महात्मा गांधींजी कुटी आणि त्याचा इतिहास -


1936 मध्ये महात्मा गांधी सेवाग्राममध्ये आले. गांधीजींनी स्वतःच्या कुटीचं निर्माण स्थानिक वस्तूपासून आणि स्थानिक लोकांच्या मदतीने व्हावा ही इच्छा होती. त्यावेळेस महात्मा गांधींची पहिली कुटी मात्र 100 रुपयात बनवण्यात आली. सेवाग्राम आश्रमात जेव्हा कुटीचं काम करण्यात आलं तेव्हा स्थानिक वस्तूंचा वापर करण्यात आला. त्यात लाकूड फाटा असो की इतर साहित्य आणि मजूर यांच्या साहाय्याने बनविण्याचा महात्मा गांधींचा आग्रह होता. त्यामुळे 85 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही इथल्याचं वस्तूंचा उपयोग करत ऐतिहासिक वास्तूचं संरक्षण केलं जातं.



अनेक काळानंतरही बापू कुटीचं संरक्षण -


बापूंच्या विचाराप्रमाणे आजही ही त्यांच्या कुटीचं रक्षण केलं जातं. पहिले वर्धा जिल्ह्याच्या जुनोना येथून सिंदीची पाने आणली जात होती. मात्र यंदा झाडे कमी असल्याने पूजई येथून आणण्यात आली आहे. बांबूच्या मदतीने या झांज्या तयार केल्या जातात. कुटीसह येणाऱ्या दर्शनार्थी यांना पाणी लागू नये यासाठी उपाययोजना आश्रमकडून केल्या जातात.



सिंदीच्या पानांचा वापर कसा केला जातो? 


पाण्यापासून बचावाकरिता लावलेल्या सिंदीच्या पानांचा आकार टोकदार असतो. या पानांची उतरत्या पद्धतीनं बांबूच्या कड्यांवर ठेवून झांजी ही मातीच्या भिंतीवर आच्छादित करतात, त्यामुळे भिंतींपर्यंत पावसाचं पाणी पोहोचत नाही. अशाच प्रकारे दरवर्षी हा उपक्रम राबवत अशाच पद्धतीने ऐतिहासिक ठेवा जपला जातो. जेणेकरुन येणाऱ्या पिढीला त्याच परिस्थितीतच ही वास्तू पाहायला मिळेल.सेवाग्राम आश्रमाची आंतरराष्ट्रीय ओळख आहे. त्याचं जतन पारंपरिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आजही आश्रमात परंपरांचा ठेवा जपला जात आहे.