मुंबई : हिंमत असेल, तर सरकार पाडा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं. संजय राऊत यांनी सामनासाठी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. आता उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजपनेही प्रत्युत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंमत असेल, तर सरकार पाडा, हा उद्धव ठाकरेंचा फिल्मी डायलॉग असल्याचा टोला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. महाविकासआघाडीचं हे सरकार अंतर्गत लाथाळ्यांमुळे कोसळेल, असं भाकीतही मुनगंटीवार यांनी केलं. उद्धव ठाकरेंचं हे वाक्य इतर नेत्यांना उद्देशून नाही, त्यांच्या मनात कदाचित द्वंद्व असेल, असं मला वाटत असल्याची प्रतिक्रियाही मुनगंटीवार यांनी दिली. 


तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनीही उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका केली आहे. त्यांनी इतर कुणाला मुलाखत दिली नाही, फक्त सामनालाच दिली. आम्ही कधी गमतीनेही सरकार पाडण्याचा उल्लेख केला नाही. आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्नही करत नाही, तरीही ते सारखं तेच का सांगत आहेत? ते साप समजून भुई थोपटत आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे सरकार पाडून दाखवा म्हणत आहेत. ते त्यांच्या कार्यकर्त्यांना धीर देत आहेत असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. 


कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा केल्यानंतर सरकारचे अपयश आणि निष्क्रियता चव्हाट्यावर आणली. त्यामुळे सरकारची असुया आता दिसत असल्याचं, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले आहेत. 


ज्याप्रमाणे संताजी-धनाजी सारखे पाण्यात दिसायचे, त्याप्रमाणे सरकारी पक्षांना देवेंद्र फडणवीसांशिवाय कोणीच दिसत नाही, असा टोलाही दरेकर यांनी हाणला आहे. केंद्र सरकारने कोविडच्या परिस्थितीमध्ये काय मदत केली, याचा सविस्तर लेखा-जोखा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचंही दरेकर म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा सरकारने कोरोनाचे नियोजन आणि त्याचं निर्मुलन करण्याकडे अधिक लक्ष आणि वेळ द्यावा, असा सल्लाही प्रविण दरेकर यांनी दिला आहे.


'पुण्याकडे दुर्लक्ष करुन मुख्यमंत्र्यांचा अजितदादांना अपयशी दाखवण्याचा प्रयत्न?'