प्रफुल्‍ल पवार, झी मीडिया, रायगड : रायगडमधील कर्जत विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुती विरूदध आघाडी असा सरळ सामना होतो आहे. सातत्‍यानं रंग बदलणाऱ्या या मतदारसंघात यंदाही चुरशीची लढत पहायला मिळते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जत विधानसभा मतदारसंघावर कुठल्याही एका पक्षाची पकड कायमस्वरूपी राहिलेली नाही. राष्ट्रवादीचे सुरेश लाड गेली दहा वर्षे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. यावेळी शेकापची साथ त्यांना असणारेय. निवडणूक लढण्‍यास राजी नसलेले लाड अखेरच्‍या क्षणी पुन्‍हा मैदानात उतरले. या मतदारसंघात शिवसेनेतील अंतर्गत लाथाळ्यांचा फायदा राष्‍ट्रवादीला होत आला आहे.


सुरेश लाड यांचा सामना शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्‍याशी आहे. सेनेचे या भागात पक्षसंघटन मजबूत आहे. शिवसेनेत बंडखोरी झाली नसली तरी तिकीट न मिळाल्‍यानं सेनेतील अनेक नाराज इच्‍छुकांनी राष्‍ट्रवादीची कास धरली आहे. त्‍यामुळे थोरवे यांना सुरेश लाड यांच्‍याबरोबरच सेनेतील असंतुष्‍टांचाही सामना करावा लागतो आहे.


भविष्‍यातील मुंबईचं उपनगर अशी ओळख असलेल्‍या कर्जतमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेतील अंतर्गत कलहाचा फायदा राष्ट्रवादीला होणार की यावेळी शिवसेना बाजी मारणार हे पाहणं औत्‍सुक्‍याचं ठरणारे आहे.