COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : नागपुरातलं अजनी रेल्वे स्थानकामध्ये महिलाराज चांगलंच यशस्वी ठरलंय. या रेल्वे स्थानकातला संपूर्ण कारभार, महिला अधिकारी आणि कर्मचारीच पाहत आहेत. विशेष म्हणजे महिलांनी या स्थानकाची धुरा सांभाळल्यापासून, स्थानकाच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झालीच आहे. खेरीज तक्रारींचं प्रमाणही कमालीचं घटलं आहे. 


महिला दिनापासून नागपुरातल्या अजनी रेल्वे स्थानकाच्या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी महिलांकडे सुपुर्द करण्यात आली. तेव्हापासून स्थानकातल्या तक्रार पुस्तिकेत दोन महिन्यांत केवळ एकाच तक्रारीची नोंद झाली आहे. शिवाय 8 मार्च ते 31 मार्च या काळात या रेल्वे स्थानकाच्या उत्पनातही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. 


स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आल्यानं, अजनी स्थानकानं स्वच्छता चषकही पटकावलाय. या उल्लेखनीय बदलाबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केलंय.  विशेष म्हणजे महिला राज असलेलं अजनी हे मध्य भारतातलं एकमेव रेल्वे स्थानक आहे. इथल्या महिलांनी आपल्या कर्तृत्वानं आपली योग्यता सिद्ध करुन दाखवलीय.