मुंबई : अकाली पावसाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 8000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. हिशोब करता शेतकऱ्यांना गुंठ्याला  केवळ 80 रुपये मदत मिळणार आहे. बागायती पिकांना गुंठ्याला केवळ 180 रुपये मदत देण्याचे जाहीर करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे. आज कांद्याच्या रोपाच्या एका वाफ्याचा दर 5000 रुपये झाला आहे. बागायती पिकांचा उत्पादन खर्च तर प्रचंड आहे. अशा पार्श्वभूमीवर 80 रुपयात किंवा 180 रुपयात, नुकसान झालेल्या पिकांची भरपाई तर सोडाच, गुंठ्याला लागणारा साधा बियाणांचा खर्च सुध्दा भागणार नाही हे वास्तव आहे.


शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करायला आलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांना, शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेली ही मदत मान्य आहे का असा सवाल किसान सभा उपस्थित करत आहे. शेतकऱ्याच्या संयमाची अधिक परीक्षा पाहू नका, शेतकरी आई बापाचा अधिक तळतळाट घेऊ नका, असे अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ अजित नवले जाहीर केलेल्या या तुटपुंज्या भरपाईचा तातडीने पुनर्विचार करा व एकरला किमान 25 हजार रुपयांची सरसकट प्राथमिक मदत शेतकऱ्यांना जाहीर करा अशी मागणी किसान सभा करत आहे.