विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचा फटका समाजातील सर्वच स्तरावर बसतोय, खास करून विद्यार्थी तर दुष्काळाने होरपळून गेल्याचं चित्र आहे, औरंगाबादेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांचे दुष्काळाने जगणं कठीण झालंय, घरची आठवण येते मात्र दुष्काळ घरी जाऊ देत नाही.  औरंगाबादेत विद्यापीठात शिक्षण घेणा-या विकास ठाले विकास विद्यापीठात पदवीचं शिक्षण घेतोय, गावाला आई वडिल नाही, मात्र मायेनं वागवणारे काका काकू आहे, सध्या ऊन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने विकासलाही त्याच्या औरंगाबाद जिल्ह्यातील घारेगावला जाण्याची इच्छा होती, मात्र घरून एक कॉल आला आणि विकासचे पाय थबकले, गावात दुष्काळाने पाण्याची सोय नाही, खाण्याची अडचण आहे, त्यामुळे तिकडेच रहावे आणि पाऊस आल्यावरच घरी यावे असा संदेश त्याला त्याच्या पालकांकडून मिळाला, करणार तरी काय गावच्या शेतीत काही पिकलं नाही, पाण्य़ाची अडचण मोठी त्यात घरून येणारे पैसै बंद झाले त्यामुळे विकास आता काही काम शोधतोय आणि त्यातून जगण्याचा मार्ग शोधतोय, दुष्काळाने विकासच्या पालकांना आणि त्याला सुद्दा हतबल करून टाकलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुष्काळाचाच फटका बसलेल्या नारायणची तर आणखी विकट अवस्था, हिंगोली जिल्ह्यात त्याचं गाव आहे, घरी आई बहिण आणि भाऊ, दुष्काळाने त्यांचच जगणं कठिण झालंय, त्यात पुन्हा त्यांच्यावर भार नको म्हणून नारायण यावेळी गावाला गेलाच नाही, विद्यापीठाच्या वसतिगृहात राहून लग्नात वाढप्याचे काम करतो, त्यातून आठवड्याला 800 रुपये सुटतात त्यातून खर्च भागवत जगणं सुरु आहे, आणि स्पर्धा परिक्षांची तयारी सुद्धा आहे, घरी जाण्याची आस आहे, मात्र जाऊन करू काय अगदी जाणं येणं सुद्धा परवडणार नाही अशी अवस्था असल्याचं तो सांगतो, जालना जिल्ह्याच्या महेश ठोकरेचचीही काही वेगळी अवस्था नाही, महिन्याला जगण्याचा खर्च किमान 3 हजार दुष्काळाने गावी काहीच कमाई नाही, गावात पाणी, रोजगार नाही त्यामुळे महेश सुद्धा शहरातच राहून रोजगार शोधतोय आणि यातूनच शिक्षण पुर्ण करण्याची त्याची आता इच्छा आहे.



फक्त याच विद्यार्थ्यांची नाही तर विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांची हीच अवस्था आहे. विद्यापीठाच्या वसतिगृहात 1300 वर विद्यार्थी असतात, सहसा उन्हाळ्याच्या सुट्ट्यात सगळेच घरी जातात मात्र यावेळी 1000 वर विद्यार्थी गावाकडे परतेलच नाही, काम शोधून कसबसं इकडंच जगणं सुरु आहे, प्रत्येकाची गोष्ट वेगळी प्रत्येकाचे दुख: वेगळे, मात्र दुष्काळाने सगळ्यांनाच हतबल करून टाकलं आहे. विद्यापीठ प्रशासनानेही परिस्थीती ओळखून किमान उन्हाळ्यापुरती या विद्यार्थ्यांची राहण्याची आणि खाण्याची सोय मोफत केली आहे, दुष्काळाचे दुख प्रशासनही ओळखून आहे, किमान मुलांचे शिक्षण सुटू नये म्हणून प्रशासन ही दक्षता घेत आहे.


दुष्काळाने मुलांची मनही थिजली आहेत, घरी जाण्याची डोळ्यात आस आहे, मात्र परिस्थिती काही जावू देत नाही, गावात जाऊन पालकांवर भार होण्यापेक्षा आणि पाणी वापरणारे अजून एक तोंड वाढवण्यापेक्षा वसतिगृहात राहूनच हे वर्ष या मुलांना काढायचं आहे. दुष्काळाने नात्यांमध्ये सुद्दा एक अंतर आणलय.. आणि हे अंतर फक्त आणि फक्त येणारा पाऊसचं दूर करू शकणार आहे, त्यामुळं डोळ्यातील पाणी दूर करण्यासाठी आता प्रतिक्षा आहे, ती आभाळातून बरसणा-या पाण्याची...