दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : नव्याने निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांना शपथ घेताना मार्गदर्शक तत्व ठरवून द्या, अशी मागणी करणारं पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू तसंच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्याने निवडून आलेले आमदार आणि खासदार शपथ घेताना निर्धारित प्रारुपातील शपथ न घेता त्यामध्ये आपल्या पक्षाचे नेते तसेच आराध्य व्यक्तींची नावे जोडून शपथ घेतात. या संदर्भात सर्व संबंधितांकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे / आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे. 


शपथ ग्रहण विधीचे पावित्र्य व गांभीर्य जतन करण्यासाठी अश्या प्रकारच्या मार्गदर्शक तत्वांची गरज असल्याचे कोश्यारी यांनी वैंकय्या नायडू आणि ओम बिर्ला यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे. 


आपल्या आवडत्या पक्ष नेत्यांचे अथवा आपली श्रद्धा व निष्ठा आहे, अशा आराध्य व्यक्तींचे नाव शपथेच्या प्रारूपामध्ये जोडल्यामुळे, शपथ विधी प्रक्रियेचे गांभीर्य कमी होते, असे कोश्यारी या पत्रात म्हणाले आहेत. 


उदयनराजे यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेताना जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा दिली होती, तेव्हा उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकया नायडू यांनी त्यांना समज दिली होती. यावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी हे पत्र लिहलं आहे. 


महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक मंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांची तसंच महापुरुषांची नावं घेतली होती. यावरुन भगतसिंग कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढच नाही तर कोश्यारी यांनी वर्षा गायकवाड आणि के.सी.पाडवी यांना मंत्रिपदाची पुन्हा शपथ घ्यायला लावली होती.