मुंबई : कल्याण - अहमदनगर मार्गावरील माळशेज घाटात दरड कोसळ्याने येथील वाहतूक ठप्प आहे. घाटातील छत्री पॉईंट याठिकाणी ही दरड कोसळली असून सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. दरड कोसळल्यानंतर घाट रस्त्यावर दगडांचा मोठा ढिगारा खाली आलाय. त्यामुळे कल्याण-नगर मार्गावरील वाहतूक ठप्प पडलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांनी ताबडतोब दोन्ही बाजूने येणारी वाहतूक थांबवली आहे. घाटात वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटविण्याचे काम पूर्ण सुरु आहे. दरम्यान, दरड पूर्णपणे बाजुला करण्यात आली असून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंते दिनेश महाजन यांनी दिली.


आज शनिवार असल्याने माळशेज घाटात  गर्दी होती. पावसाच्या दिवसांत या घाटात अनेकदा दरडी कोसळण्याच्या घटना होतात. त्यातच येथील रस्ताही अरुंद असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.  चार दिवसापूर्वी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी माळशेजघाटात पर्यटकांना बंदी आदेश लागू केला होता. याची अंमलबजावणी स्थानिक प्रशासनाने केली का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.  दरड कोसळल्याची माहिती मिळताच तहसिलदार सचिन चौधर, नायब तहसिलदार हनुमंत जगताप, टोकावडे पोलिस ठाण्याचे ए पी आय धनंजय पोरे, उपनिरिक्षक सागर चौहान हे माळशेजघाटात दाखल झालेत.