Man Falls On Railway Tracks: मुंबईमधील शीव रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांदरम्यान सुरु असलेल्या एका वादादरम्यान 26 वर्षी तरुणाला कानाखाली लगावल्याने हा तरुण थेट रेल्वे ट्रॅकवर पडला आणि ट्रेनच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. संबंधित प्रकरणामध्ये या व्यक्तीला मारहाण करणाऱ्या दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

13 ऑगस्ट रोजी हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती दादर रेल्वे पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये मानखुर्दमधील एका जोडप्याला अटक केली आहे. मरण पावलेल्या तरुणाचं नाव दिनेश राठोड असं आहे. सायन रेल्वे स्थानकामध्ये दिनेशचा एका महिलेला चुकून धक्का लागला. यानंतर ज्या महिलेला धक्का लागला तिने आणि तिच्या नवऱ्याने दिनेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. दिनेशचा धक्का महिलेला लागल्याने धक्का का मारला असं विचारत या महिलेने आणि तिच्या नवऱ्याने वाद घातला. वादादरम्यानच दिनेशला महिलेच्या पतीने कानाखाली मारली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दिनेशचा तोल गेला आणि तो रेल्वे ट्रॅकवर पडला. दिनेश ट्रॅकवर पडल्यानंतर प्लॅटफॉर्मवरील सर्वचजण आश्चर्यचकित होतात. मात्र तितक्यात समोरुन लोकल ट्रेन येताना पाहून या व्यक्तीला प्लॅटफॉर्मवरील लोक वर येण्यास सांगत होते. मात्र ही व्यक्ती ट्रॅकवरुन उठून प्लॅटफॉर्मवर येईपर्यंत समोरुन येणारी लोकल या व्यक्तीच्या अंगावरुन गेली. 


मद्याच्या नशेत होता राठोड


या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आणि दिनेशला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव अविनाश माने असं आहे. तर त्याची पत्नी शितल मानेलाही अटक करण्यात आळी आहे. हा संपूर्ण घटनाक्रम शीव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर घडला. 13 ऑगस्ट रोजी रात्री 9.11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. "राठोड हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने शितलला स्पर्श केल्याचा आरोप करत तिने छत्रीने त्याला मारहाण केली. राठोडने शितलला शिवीगाळ केल्यानंतर अविनाशने राठोडला कानाखाली मारली," असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. 


जीवाला धोका असूनही मदत केली नाही


राठोड हा प्लॅटफॉर्मच्या अगदी कडेला उभा होता असंही पोलिसांनी सांगितलं आहे. "लोकल ट्रेनने राठोड प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला चिरडलं आणि त्याचा मृत्यू झाला," असं पोलिसांनी सांगितलं. मात्र माने दांपत्याने या प्रकरणामध्ये गर्दीचा फायदा घेऊन पळ काढला. माने दांपत्याने राठोडला पुन्हा प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी मदत केली नाही. राठोडला ट्रेन धडक देईल आणि त्याचा जीव जावू शकतो हे माहिती असूनही माने दांपत्य त्याच्या मदतीला आलं नाही. या दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



सीसीटीव्हीमधून दांपत्याला शोधलं


"राठोड हा घणसोलीचा रहिवाशी होता. सीसीटीव्हीच्या माध्यमातून या जोडप्याचा शोध घेतला असता ते मूळचे कोल्हापूरचे असून मानखुर्दमध्ये राहतात अशी माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली," असं पोलिसांनी सांगितलं.