फॅशनस्ट्रिटवर पूर्ववैमन्यासातून गोळीबार, पोलिसात गुन्हा दाखल
पुण्यातील गजबजलेला कॅम्पमधील फॅशनस्ट्रिट परिसरात एकावर गोळीबार केल्याची घटना घडली.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील गजबजलेला कॅम्पमधील फॅशनस्ट्रिट परिसरात एकावर गोळीबार केल्याची घटना घडली. गोळीबार पूर्ववैमन्यासातून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. व्यापारी संघटनेतील दोघांमध्ये वादातून हा गोळीबार झाल्याचे उघडकीस आले आहे. 14 जून रोजी (मंगळवारी) रात्री 8:30च्या वाजण्याच्या सुमारास घडली.
हल्ल्यात तौफिक अख्तर शेख या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. जुल्फीकर शेख नावाच्या व्यक्तीने गोळीबार केल्याचे समोर आले आहे. अख्तर शेख गंभीर जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमकं 'त्या' रात्री काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तौफिक शेख आणि जुल्फीकर शेख नावाचा व्यक्ती व्यापारी संघटनेचे संबंधीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु होता. मंगळवारी रात्री तौफिक शेख हा फॅशनस्ट्रिट परिसरातील एबीसी फार्म नावाच्या दुकानाजवळ आला असताना त्याचवेळी जुल्फीकरने बंदुक घेऊन पोहचला. तौफिक यांना पाहून त्याने तौफिकवर गोळीबार केला. गोळीबारात तौफिक जखमी झाला. गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी ऐन रात्रीच्यावेळी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.