सचिन कसबे, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : आपण संत बाळूमामा यांचे अवतार आहोत किंवा शिष्य आहोत असं तर कुणी तुम्हाला सांगत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण बाळूमामांच्या वंशजावरून मोठा वाद पेटला आहे. बाळूमामा देवालय ट्रस्ट आणि आदमापूर ग्रामपंचायतीनं या कथित वंशजाविरोधात कडक पाऊल उचललं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संत बाळूमामा म्हणजे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान. त्यांचं मूळ स्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमपुरात अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र आता त्यांच्या नावानं एका नव्या बाबानं बस्तान मांडल्याचा आरोप होतोय. मनोहर भोसले असं या बाबाचं नाव. करमाळा तालुक्यातल्या उंदरगावचा मनोहर भोसले स्वत:ला बाळूमामांचा वंशज आणि शिष्य म्हणून बनाव करत असल्याचा आरोप कोल्हापूरच्या आदमापूर ग्रामपंचायत आणि बाळूमामा देवालय़ ट्रस्टनं केला. 




बाळूमामांनी समाधी घेतलेल्या आदमापूरच्या ग्रामस्थांनी या भोसलेबाबाविरोधात जोरदार मोहीम सुरु केली आहे. तसंच बाळूमामांचे कुणीही वंशज नाहीत. त्यामुळे मनोहर भोसले आणि बाळूमामांचा कोणताही संबंध नसल्याचा ठरावच ग्रामपंचायतीनं केला आहे. मनोहर भोसलेविरोधात अनेक पुरावेही गोळा केले आहेत. मात्र आपण बाळूमामांचा वंशज असल्याचा कोणताही दावा केला नसल्याचं मनोहर भोसलेंनी सांगितलंय.



बाळूमामांनी आपलं सारं आयुष्य गोर गरिबांसाठी वेचलं. त्यांनी कधी कुणाकडून एक दमडीही घेतली नाही. मात्र त्यांच्याच नावानं देवत्वाचा बुरखा पांघरून कुणी सामान्यांची लूट करत असेल तर अशा भोंदूला चांगलीच अद्दल घडवण्याची मागणी आदमापूर ग्रामपंचायतीनं केली आहे.